निफाड : आ. बनकरांची अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक
नाशिक

निफाड : आ. बनकरांची अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आढावा

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून करोना महामारीतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील सेवक, सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी सर्व शासकीय विभागाची आढावा बैठक घेतला.

या आढावा बैठकीत पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आलेल्या करोना सेंटरमध्ये स्वच्छता, बिछाना व जेवणाबाबतच्या तक्रारी काही नागरिकांकडून आल्या आहे. त्यामुळे यापुढे या सेंटरमध्ये साफसफाई व जेवणाबाबत उपाययोजना करण्यात याव्यात व यापुढे तक्रार येणार नाही अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पोलीस विभागाला आपल्या हद्दीतील कुठल्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू होऊ नये याकरीता कार्यवाही करण्यात यावी तसेच इतर वाद लवकरात लवकर मार्गी लावावे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमीओपॅथिकच्या अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप करण्यात आले असून त्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. शिल्लक राहिलेल्या कुटुंबियांना या गोळ्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना रेशन कार्ड वाटप तत्काळ करण्यात यावे. तसेच निफाड नगरपंचायतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत ४.८० कोटी रु. निधी मंजूर झालेला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यासाठी सूचना करण्यात आली. निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट मुल्याकंन संदर्भांत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. करोना व इतर विविध अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, निफाड पं.स.चे गटविकास अधिकरी संदीप कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे, पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले, निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी, प्रकल्प अधिकारी अभिमान माने, पो.नि. संजय महाजन, भगवान मथुरे, रंगराव सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आदींसह रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com