निमाच्या निवडणूक कार्यक्रमाला गती मिळण्याची शक्यता

निमाच्या निवडणूक कार्यक्रमाला गती मिळण्याची शक्यता

सातपूर । रविंद्र केडीया Satpur

निमाच्या ( NIMA )सुवर्ण महोत्सवी वर्षात सत्तेसाठीच्या लढाईत दोनही गटांच्या अहंकाराने निमाला वेठीस धरुन, तिचा कारभार तीन सदस्यांच्या प्रशासकीय समितीकडे सोपवण्याची नामुष्की ओढावून घेतलेली आहे. लवकरच विश्वस्तांसाठीच्या मुलाखती घेतल्या जाण्याचे संकेत असल्याने हा प्रश्न वेगाने निकाली निघेल, असा विश्वास उद्योगक्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

निमाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यकाळात अनेक दिग्गजांनी आपल्या कार्यप्रणालीतून निमाच्या प्रतिमेला झळाळी देण्याचाच प्रयत्न केला होता. निमाच्या कामकाजातून राज्यभरात संघटनेच्या कार्याचा दरारा निर्माण केला होता. निमाच्या पुढाकाराला राज्यभरातील उद्योजक संघटना सन्मानाने पहात होत्या.

त्याच संघटनेच्या सत्तेसाठीचा वाद विकोपाला नेण्यासोबतच त्याला राजकारणाची जोड दिली गेल्याने निमाच्या प्रतिमेची मात्र नालस्ती झालेली आहे. उच्चन्यायालय, धर्मदाय उपायुक्त, धर्मदाय सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात सुनावण्याच्या फेर्‍या झाल्या. यानंतरही मागील 50 वर्षांंची उज्ज्वल परंपरा असताना उद्योजक संघटनेचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योग क्षेत्रातून फिट पर्सन न सापडणे हे उद्योग क्षेत्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

प्रशासक समितीच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज पाहिले जात आहे. निमाच्या सुवर्ण महात्सवी वर्षात पहिल्यांदा उद्योजकांच्या संघटनेची धुरा प्रशासकीय समितीकडे देण्याची नामुष्की सहन करावी लागली. यात दोनही पक्षांच्या हेकेखोर भूमिकेचे अपयश असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

धर्मदाय उपायुक्तांच्या न्यायालयाने तातडीने निमाची सूत्रे देण्याच्या दृष्टीने मुलाखती घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले असल्याने, लवकरच नव्या विश्वस्थांच्या नियुक्तीच्या माध्यमातून निमाच्या प्रलंबित पडलेल्या निवडणुकांच्या कार्यक्रमाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.