निमातील विवाद 'सोशल' चव्हाट्यावर

निमातील विवाद 'सोशल' चव्हाट्यावर
निमा हाऊस

सातपूर | प्रतिनिधी Satpur

निमा कार्यालय सेल्फ कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर,कार्यालयात होणारे आरोप प्रत्यारोप आता सोशल मीडियावर रंगू लागले आहेत. त्यामुळे काही लोक मध्यस्थीसाठी जरी सक्रिय झाल्याचे दिसत असले तरी, दोन्हीकडील एका गट मात्र वाद वाढविण्याची खुमखुमी असल्याचे चित्र आहे.

निमाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पदभार न सोडण्याचा निर्णय घेत माजी अध्यक्ष विश्वस्त मंडळ निवडणूक समिती व निमाच्या घटनेला पिंजऱ्यात उभे केले आहे दरम्यान निमाचे कर्मचारी करोना बाधित असल्याचे समजल्याने कार्यालयच १४ दिवसांसाठी बंद करण्यात आले. यामुळे उद्योजकांमध्ये भिती व्यक्त होत आहे. 'आता वाद पुरे' असे म्हणत एक गट सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. निमाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी बोलून या वादावर काय तोडगा काढता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

परंतु, दुसरा एक गट त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर युद्ध मोठ्याप्रमाणात पेटले असून, एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यातील काही पोस्ट व्यक्तिगत आयुष्यावर आहेत, तर काहींमध्ये एमआयडीसीचे कोणी किती प्लॉट बळकावले याच्याशी संबंधित आहेत.

उद्योजकांच्या विविध ग्रुपवर जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जात असल्याने प्रकरण निवळण्याऐवजी गंभीरच होताना दिसत आहे. परस्परांची उणीदूणी काढण्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याने सोशल मीडियावर उद्योजकांची करमणूक सुरू झाली आहे त्याचवेळी संस्थेची बदनामी प्रसारमाध्यमातील प्रक्रियांमुळे होत असल्याची टीका करणारे उद्योजक सोशल मीडियावरील या टोलेबाजी वर गप्प बसल्याने नागरिक त्यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करतं आहेत

एकूणच निमाचे कार्यालय बंद असल्याने उद्योजकांच्या "कुस्त्या" सोशल मीडियावर भिडल्याने हा वाद मिटणार तरी केव्हा असा प्रश्न संस्थेच्या सभासदाद्वारे उपस्थितकेला जात आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com