'निमा'चा वाद विकोपाला

स्मृतिदिना निमित्त पद्मश्री राठी यांना ‘निमा’मध्ये दोन वेळा अभिवादन
निमा हाऊस
निमा हाऊस

सातपूर । प्रतिनिधी Satpur

औद्योगिक वसाहतीचे जनक पद्मश्री बाबुभाई राठी यांच्या 32 व्या स्मृतिदिना निमित्त 'निमा' मध्ये अभिवादन केले.

मात्र, निमातील विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ व त्यांच्याद्वारे नियुक्त पदाधिकार्‍यांनी सकाळी अकरा वाजता तर विद्यमान संचालक मंडळाने सायंकाळी 4 वाजता निमा सभागृहात पद्मश्री बाबुभाई राठी यांना दोन वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे अभिवादन केले.

औद्योगिक क्षेत्रातील विविध संघटनांच्या माध्यमातून पद्मश्री बाबुभाई राठी यांना अभिवादन केले जाते. त्यादृष्टीने संयुक्तरित्या निमा कार्यालयात सकाळी अकरा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम केला जात असतो.

त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, विश्वस्त मंडळ नियुक्त निमा अध्यक्ष विवेक गोगटे, आशिष नहार, संदीप भदाणे यांच्या उपस्थितीत बाबुभाई राठी यांचे नातू अखिल राठी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.

त्यापाठोपाठ सायंकाळी 4 वाजता निमाच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी पद्मश्री बाबुभाई राठी यांना आदरांजली वाहिली. यावेळी अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहेर, सुधाकर देशमुख, कार्यकारिणी सदस्य रावसाहेब रकिबे, मिलिंद राजपूत आदींसह निमाचे कार्यालयीन सेवक उपस्थित होते.

निमाच्या इतिहासात पहिल्यांदाच परस्परांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत असून, औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसाठी योगदान देणार्‍या पद्मश्री बाबुभाई राठी यांचा स्मृतिदिनही एकाच इमारतीमध्ये दोन वेळा साजरा होणे, ही नवी परंपरा सुरू झाली असल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com