‘निमा’चा निकाल धर्मादाय कोर्टात

मुदतवाढीनंतरही चर्चा निष्फळ
‘निमा’चा निकाल धर्मादाय कोर्टात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या 'निमा' ( NIMA )विश्वस्तांची नावे कळवण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांनी दिलेली 15 दिवसांची मुदत आज संपली असून त्यामुळे आता धर्मादाय सहआयुक्तच याबाबतचा निकाल देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नाशिकच्या उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या निमा पदाधिकार्‍यांत निवडणुकीवेळी वाद होऊन सन 2020 मध्ये या संस्थेचे कामकाज ठप्प झाले होते. पदाधिकार्‍यांच्या आपापसातील हेव्यादाव्यांमुळे धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडून डिसेंबर 2020 मध्ये संस्थेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. पुढे दोन वर्षांपासून कामकाज ठप्प होते. धर्मादाय आयुक्तालयाकडून विश्वस्तपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात 40 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील एक रद्दबातल झाला. उद्योजकांनी समन्वयाने नावे देण्याचा प्रस्ताव ठेवत धर्मदाय आयुक्तालयाद्वारे 39 इच्छुकांपैकी सर्वसहमतीने सात नावे कळवावी, अशी सूचना धर्मादाय सहआयुक्तांनी दिली होती.

त्यात एकमत न झाल्याने पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ दिली. धनंजय बेेळे, मंगेश पाटणकर व तुषार चव्हाण या तिघा माजी अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या तिघांची बैठकही झाली. मात्र, नंतर या तिघांमध्ये निवडीवरून खल जास्त झाले. शेवटी तडजोड अंतिम टप्प्यात आली असताना सिन्नरच्या उद्योजकांनी जास्त सदस्यांची मागणी रेटून धरल्याने निर्णय अधांतरीत राहिला.

परस्परांच्या समन्वयातून निर्णय घेण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदत दिली होती. दरम्यान, निर्णायक भूमिका न झाल्याने धर्मादाय सहआयुक्तांकडून घेतल्या जाणार्‍या निर्णयाचीच प्रतीक्षा आता उद्योजकांना राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com