‘निमा’ कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा नवा खेळ

निमा हाऊस
निमा हाऊस

सातपूर । Satpur

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफेॅक्चर्स असोसिएशनची (निमा) निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने निवडणूक कार्यक्रम स्थगित करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विद्यमान कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे पत्र तसेच शासनाचे आदेश यांचा हवाला देत विद्यमान कार्यकारिणीला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार असल्याचा निर्वाळा विद्यमान पदाधिकार्‍यांनी दिला. यामुळे 31 जुलैला मुदत संपणार असणार्‍या कार्यकारिणीला आता 31 ऑक्टोबरपर्यंत कामकाज करता येणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी या कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सहकारी संस्थांसह विविध निवडणुका दोन वेळा आदेश काढून तीन महिने पुढे ढकलल्या असल्या तरी निमाची निवडणूक मात्र निर्धारित वेळेत करण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न सत्ताधार्‍यांनी उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निमाच्या निवडणूका स्थगित केल्याचा निर्णय निवडणूक समितीने जाहीर केला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निमा कार्यकारिणी आणि पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक झाली. ज्यात शासनाच्या आदेशांचा हवाला देत तीन महिन्यांकरिता विद्यमान कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाल्याचा निर्वाळा पदाधिकार्‍यांनी दिला.

निमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदाची द्वैवार्षिक निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली. विश्वस्त मंडळ नियुक्त निवडणूक समितीवर विद्यमान कार्यकारिणीने घेतलेला आक्षेप व यामुळे निवडणूक समिती बदलण्याची विश्वस्त मंडळावर आलेली नामुष्की, तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक समितीवर ती स्थगित करण्याची आलेली वेळ, निमामध्ये नेमलेले बाउन्सर आणि निवडणूक समितीला निवडणूक कार्यक्रम स्थगित केल्याची नोटीस चिकटविण्यापासूनही रोखल्याचे प्रक्रियाच नाट्यमय झाल्याने उद्योजकांसाठी नाशिककरांचीही करमणूक झाल्याचे पहायला मिळाले.

विश्वस्त मंडळ ट्रस्ट बीओटी समितीच्या माध्यमातून अथवा धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून संस्थेला मुदतवाढ मिळू शकत असते. निमाच्या विद्यमान कार्यकारिणीला बीओटीने मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी मुदतवाढ दिली आहे किंवा कसे हे तपासून पाहावे लागेल.

मनिष कोठारी, अध्यक्ष बीओटी

निमाचा कारभार हा अतिशय जुन्या घटनेवर चालू आहे हा माजी अध्यक्षांच्या मालिकेत घटना नोंदवण्याचे काम झालेच नाही. ज्या घटनेचा आधार सांगितला जातो ती घटना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदवलेली नसल्याचा निर्वाळा आयुक्तांनी दिलेला आहे.

-शशी जाधव, अध्यक्ष निमा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com