नवनियुक्त मनपा आयुक्त मैदानात

विभागीय कार्यालयांमध्ये घेतला कामाचा आढावा
नवनियुक्त मनपा आयुक्त मैदानात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अवघ्या चार महिन्यांत रमेश पवार यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली करत शासनाने तडकाफडकी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांची महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली. शनिवारी त्यांनी एकतर्फी पदभार स्वीकारला तर सोमवारी विविध अधिकार्‍यांकडून कामकाजाचा आढावा घेतला तर काल थेट मैदानात उतरून त्यांनी शहरातील विविध विभागीय कार्यांलयांमध्ये भेटी देऊन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच मनपाच्या दवाखान्यात जाऊन देखील कामाचा आढावा घेतला.

नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल महापालिकेच्या विविध आस्थापनांना भेट देत अधिकार्‍यांशी संवाद साधला. पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिक रोड विभागीय कार्यालयाची पाहणी केली. तेथील एक खिडकी योजनेची पाहणी करुन नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी उपायुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील उपस्थित होते.

मनपाच्या रुग्णालयांचाही पाहणी केली. इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालयाचीही पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला. इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती चिरमाडे यांनी तर बिटको रुग्णालयात डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी आयुक्तांना माहिती दिली.

तसेच तपोवन एसटीपी प्रकल्प म्हणजेच मलनिस्सारण केंद्र आणि निलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण केंद्राचीही आयुक्तांनी पाहणी केली. अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत यावेळी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड कट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे उपस्थित होते.

आयुक्तांची तंबी

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सुविधा पुराव्यात तसेच त्यांच्या तक्रारींचे वेळेवर निरसन व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी तसेच सेवकांनी पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज असल्याचे सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. तसेच कामांमध्ये चूक झाली तर कायदेशीर कारवाई होणारच, अशी तंबीदेखील दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com