पाणीपुरवठा नवीन आराखड्याला लवकरच मंजूरी

लासलगाव पाणीपुरवठा आढावा बैठकीत भुजबळांचे आश्वासन
पाणीपुरवठा नवीन आराखड्याला लवकरच मंजूरी

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करणार .

यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन मंजूरीसाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असा आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

भुजबळ फार्म येथे झालेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता संजय मिस्त्री, विस्तार अधिकारी एस.के. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, लासलागावचे मा. उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एम.एस. गणेशे, शाखा अभियंता अमोल घुगे, पांडूरंग राऊत, विजय सदाफळ उपस्थित होते.

यावेळी नव्या आराखड्यास मंजूरी मिळेपर्यंत योजनेच्या पाईपलाईनचे जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत. सोळागाव योजनेची पाईपलाईन 15 ते 20 वर्ष जुनी असलेली पाईपलाईन खराब झाल्याने अनेकदा लिकेजचे प्रश्न निर्माण होत असतात. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी विधान सभेच्या सभागृहात विषय मांडला होता. त्यानुसार सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन लाईन टाकणे व विजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसविण्यास मंजूरी मिळाली होती.

एकूण 15 कोटींचा आराखडा मंत्रालय स्तरावर आहे. यासंदर्भात बैठकीतूनच दूरध्वनीवरुन पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजय चहांदे यांचेसोबत पालकमंत्री भुजबळ यांनी चर्चा केली. पाणी पुरवठ्याची वीज खंडित होऊन अनेक नवनवीन प्रश्न तयार होत असतात. यावर उपाय म्हणून हा विजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील महावितरणच्या अधिकार्‍यांना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच धुळगाव, राजापूर आणि मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत त्यांचेही आराखडे तयार करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com