सेन्ट्रल जेलमध्ये दाखल होण्याआधी कैदीही राहणार 'क्वारंटाईन'

सेन्ट्रल जेलमध्ये दाखल होण्याआधी कैदीही राहणार 'क्वारंटाईन'

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा सुनावलेले कैदी आता थेट दाखल केले जाणार नाहीयेत. कैद्याला जेलमध्ये दाखल करण्याआधी त्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. त्यानंतर लक्षणे दिसत नसतील तरच त्या कैद्याला कारागृहात दाखल केले जाणार आहे...

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन त्यांना दि.1 मे पासून जेलरोडच्या के. एन. केला शाळेतील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारागृहाचे अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

अडीचशेची क्षमता

केला शाळेत गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये जेल सुरु करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य कारागृहातील कैद्यांचा करोनापासून बचाव झाला होता. दहा महिन्यांनंतर हे जेल बंद करण्यात आले.

आता पुन्हा करोनाची लाट आल्याने शाळेचा एक भाग ताब्यात घेऊन जेल सुरु करण्यात आले आहे. बाहेरून जाळ्या बसविणे, दरवाजे करणे आदी कामे झाली आहेत. पोलिस आयुक्तालयाकडून दहा ते बारा पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त मिळणार आहे.

कच्चे-पक्के मिळून 250 कैदी ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने करोनापासून कैद्यांना सुरक्षा मिळावी म्हणून विशेष सूचना केल्या आहेत. त्यानुसार कैदी आणल्यावर त्याची करोना टेस्ट केली जाईल.

14 दिवस ठेवल्यानंतर पुन्हा करोना टेस्ट करुन त्याला मुख्य कारागृहात हलविले जाईल. रोज सुमारे चाळीस कैदी केला जेलमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मदतीला कारागृहाचे पन्नास कर्मचारी असतील.

गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नाशिकरोड कारागृहाने कारागृहामध्ये तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. के. एन. केला इंग्रजी शाळा व साने गुरुजी शाळा ताब्यात घेतली होती.

मुंबई, पुणे, जळगाव, धुळे आदी कारागृहांमध्ये कैदी व कर्मचा-यांना करोना संसर्ग झपाट्याने होत असताना नाशिकरोड कारागृहाने करोनाला प्रवेशव्दारावरच रोखले. जिल्हाधिका-यांपासून सर्वांनी या उपाययोजनांची प्रशंसा केली.

बाहेरुनच धोका

नाशिकरोड कारागृहात मुंबई, नगर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून कैदी हस्तांतर होत असतात. दहा दिवसांसांपूर्वी कोपरगावच्या साठ कच्च्या कैद्यांना नाशिक, पुणे, नगरच्या कारागृहात पाठविण्यात आले.

नाशिकरोड कारागृहात यापैकी वीस कैदी दाखल झाले. कारागृह प्रवेशव्दारावर त्यांची करोना चाचणी केल्यावर दहा कैदी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कारागृहातील स्वतंत्र कक्षात ठेवून डॉ. ससाणे यांनी उपचार केले.

या कैद्यांची प्रकृती सुधारली आहे. हे कैदी थेट मुख्य बराकीत दाखल झाले असते तर अडीच हजार कैद्यांना करोना संसर्ग झाला असता. करोनाची दुसरी लाट आली आहे. कारागृहाच्या कर्मचा-यांना खासगी व प्रशासकीय कामानिमित्त कारागृहाच्या बाहेर जावे लागते. त्यांना करोनाची बाधा होऊ लागली आहे.

या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाने केला शाळेत पुन्हा जेल सुरु केले. करोना रोखण्यासाठी सध्या कैद्यांना कोर्टात व्हीसीव्दारे सादर केले जात आहे. कैदी-नातेवाईक मुलाखती, गळा भेट उपक्रम बंद करुन फोन सुविधा सुरु केली आहे.

कोर्टाच्या आदेशाने कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. आत येणा-या प्रत्येकाची करोना टेस्ट, तापमान नोंद केली जात आहे. सत्संग व अन्य उपक्रम बंद आहेत. समुपदेशन, ग्रंथालय, क्रीडा आदी सुविधा सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com