ओझे l Oze (विलास ढाकणे)

दिंडोरी तालुक्यात साठ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुक जाहिर झाल्या असून अनेक गावामध्ये पॅनल तयार झाले असून अनेक उमेदवार प्रचाराला सुध्दा लागले आहे. मात्र अचानक निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार सातवी पास असावा आशी अट टाकल्यामुळे अनेक ठिकाणी सातवी पास उमेदवार शोधण्याची वेळ पॅनल प्रमुखावर आल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

शुक्रवारी निवडणुक आयोगाने सदस्यापासून ते सरपंचपदा पर्यत किमान सातवी पास हि अट अनिवार्य आहे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याने काही ठिकाणच्या उमेदवाराकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेक गावामध्ये कागदपत्रे पूर्ण असलेले व पात्र उमेदवार शोधणे खूप कठिण असते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दोन-दोन महिने आधी उमेदवार शोधुन कागदपत्रे पूर्ण करावी लागतात तेव्हा कुठे पॅनल तयार होतात ग्रामीण भागामध्ये आजहि जुने लोक राजकारणात दिसून येतात.

मात्र त्यांचे शिक्षण कमी असते परंतु आतापर्यंत निवडणुक आयोगाने शिक्षणाची अट टाकलेली नव्हती त्यांमुळे जुन्या लोकानां निवडणुक सोपी व्हायची मात्र आता निवडणुक आयोगाने सातवी पास अट टाकल्यामुळे युवा नेतृत्वाकडे ग्रामपंचायत जाणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

निवडणुक आयोगाच्या सातवी पासच्या अटीमुळे ऐनवेळी अनेक उमेदवारानां निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्या उमेदवाराच्या जागेवर सातवी पास उमेदवार देण्यासाठी उमेदवाराची व त्याची कागदपत्रे शोधण्याची मोहिम सध्या सुरु आहे.

त्यात प्रामुख्याने जातीचा दाखला, पडताळणीचे प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तसेच अन्य महत्वाची कागदपत्रे नसल्यामुळे पॅनल प्रमुखाचा गोंधळ उडाला असून अर्ज भरण्याचा कालावधी ३० डिसेंबर असल्यामुळे उमदेवाराची कागदपत्रे जमविण्यास दमछाक होत आहे.

ग्रामीण भागातील सुशिक्षित युवावर्गाकडून निवडणुक आयोगाच्या शिक्षणाच्या अटीचे स्वागत करण्यात येत आहे. कारण या निर्णयामुळे तरुण सुशिक्षित वर्गाचा ग्रामपंचायतमध्ये प्रवेश होणार असल्याने तरुण वर्गामध्ये उत्साह दिसून येत आहे.