निफाडनामा : नव्या गट, गणरचनेत सोयीचे गणित

राष्ट्रवादी-शिवसेनेतच अटीतटीच्या लढतीचे चित्र
निफाडनामा : नव्या गट, गणरचनेत सोयीचे गणित
USER

निफाड | आनंदा जाधव Niphad

आगामी जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) व पंचायत समिती ( Panchayat Samiti ) गट, गणांंची रचना काल गुरुवार दि.2 जून रोजी निश्चित झाली असून यात अनेक मातब्बर नेत्यांचे गट आणि गण बदलले आहेत. तर अनेक नेत्यांना सोईचे गट तयार झाले आहेत. तालुक्याच्या नव्या रचनेत 10 गट आणि 20 गणांची निर्मिती झाली असून गट आणि गण रचनेत सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा राहिल्याचे दिसत आहे. त्यातच अनेक गण नामशेष होऊन नव्याने गणांची निर्मिती झाली आहे.

नव्याने अस्तित्वात आलेल्या पिंपळस रामाचे गणात सुकेणे आणि उगाव गटातील गावे समाविष्ठ करण्यात आली आहे. राज्यात सत्तेत असणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हेच पक्ष तालुक्यात जि.प. च्या निवडणुकीसाठी ( Elections ) एकमेकांशी भिडणार आहेत. त्यातच मुख्यत्वे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता अधिक आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मतदारासह नेत्यांना गट रचनेचे वेध लागले होते. अखेरीस आयुक्त कार्यालयाने गट आणि गणाची रचना जाहीर केली आहे. ओझर नगरपरिषद अस्तित्वात आल्याने हा गट कमी झाला असला तरी तालुक्यात 10 गट आणि 20 गण कायम राहिले आहेत. त्यात पिंपळगाव बसवंत गटात उंबरखेड आणि पिंपळगाव बसवंत असे दोन गण तयार झाले असून आमदार दिलीप बनकर यांचेसाठी हा गट सोईचा झाला आहे. तसेच माजी सरपंच भास्कर बनकर यांचेसाठी देखील आशादायक ठरणारा आहे.

साहजिकच या गटात राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश बनकर, भाजपचे सतीश मोरे, बापू पाटील, शिवसेनेचे भास्कर बनकर, राजेश पाटील, मनसेचे प्रकाश गोसावी यांचे हौसले बुलंंद झाले आहे. तर पालखेड गटातील नांदुर्डी हे गाव उगाव गटाला जोडण्यात आले तर उगाव गटाचा रानवड गण आता पालखेड गटाचा गण झाला आहे. त्यामुळे भाजपचे लक्ष्मण निकम तसेच आमदार दिलीप बनकर तर शिवसेनेचे पंडीत आहेर यांचेसाठी हा गट अनुकूल ठरणारा आहे. लासलगाव गटाची मोठी तोडफोड करण्यात आली असून टाकळी विंचूर आणि लासलगाव असे दोन गण तयार झाले आहेत. साहजिक या गणात राष्ट्रवादीचे जयदत्त होळकर, भाजपचे डी.के. जगताप, शिवसेनेचे शिवा सुरासे पुन्हा नशिब अजमाविण्याची शक्यता आहे.

जि.प. चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या विंचूर गटाची मोठी तोडफोड झाली असून या गटात पिंपळगाव नजिक व विंचूर असे दोन गण नव्याने तयार झाले आहेत. पिंपळगाव नजिक गणात पूर्वी लासलगाव गणात असणारी गावे जोडण्यात आली असली तरी थोरे यांचा जनसंपर्क विचारात घेता त्यांचेसाठी गट लाभदायक ठरणारा असला तरी शिवसेना व भाजपला मात्र मोठी डोकेदुखी ठरणारा आहे. त्यामुळे येथे भाजपचे डी.के. जगताप कशी व्यूहरचना आखतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

उगाव व कसबे सुकेणे गटाचे विभाजन करून नव्याने अस्तित्वात आलेल्या पिंपळस रामाचे गटात कोठुरे व पिंपळस हे दोन गण तयार झाले असून पिंपळस गणात खेरवाडी, मौजे सुकेणे तर कोठुरे गणात नैताळे, श्रीरामनगर, शिवरे, जळगाव, दिंडोरी ही गावे समाविष्ठ करण्यात आली असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांना अनुकूल असणारा हा गट इतरांसाठी मात्र झोप उडविणारा ठरणारा आहे.

तर कसबे सुकेणे गटात कोकणगाव व कसबे सुकेणे हे दोन गण असून पालखेड गटातील नारायणटेंभी हे गाव समाविष्ठ झाले आहे. तसेच साकोरे मिग, दीक्षी आदी गावांचा समावेश आहे. शिवसेनेचे दीपक शिरसाठ, राष्ट्रवादीचे नानासाहेब भंडारे तसेच भाजपचे यतिन कदम यांचेसाठी मात्र हा गट अनुकूल ठरणारा आहे. माजी जि.प. सदस्य सिद्धार्थ वनारसे यांचा गट मात्र शाबूत राहिला असून चांदोरी व चाटोरी हे दोन गण या गटात जैसे थे राहिले आहे. साहजिकच राष्ट्रवादीचे सिद्धार्थ वनारसे यांचेसह शिवसेनेचे संदिप टर्ले, उत्तम गडाख पुन्हा रणसंग्राम गाजविण्याची शक्यता आहे.

सायखेडा गटात करंजगाव गण नामशेष होवून सोनगाव व सायखेडा हे दोन गण अस्तित्वात आले आहेत. सोनगाव गटात देवगाव गटातील खानगाव थडी, तारूखेडले, तामसवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. साहजिकच राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिन्ही पक्षांना येथे नशिब अजमाविण्याची संधी मिळणार असून तिन्ही पक्षामध्ये मातब्बर नेेते आहेत तसे काँग्रेसकडून पुन्हा दिगंबर गिते नशिब अजमाविण्याची शक्यता आहे.

देवगाव गटात नांदूरमध्यमेश्वर आणि देवगाव हे दोन गण तयार झाले असून जुन्या गणांची मोठी तोडफोड झाली आहे. या गणातील नदीपलिकडील तीन गावे सायखेडा गटाला जोडली असली तरी नवीन गावांचा मात्र समावेश झाला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा गट दिलासा देणारा ठरणारा आहे. साहजिकच राष्ट्रवादीकडून अमृता पवार, हरिश्चंद्र भवर, विनोद जोशी, शिवाजी सुपनर तर शिवसेनेकडून विलास शिंदे, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर तासकर, रयत क्रांतीकडून शिवनाथ जाधव, भाजपकडून संजय नागरे तर काँग्रेसकडून विजय सदाफळ उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहतील. नव्या गट रचनेवर एक नजर टाकली असता अनेक गट हे शिवसेना व राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरणारे आहेत.

साहजिकच या दोन्ही पक्षातील नेत्यांचे हौसले बुलंद झाले असून उगाव गटात पुन्हा एकदा माजी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर विरुद्ध काँग्रेसचे भास्कर पानगव्हाणे यांच्यातच सामना रंगण्याची शक्यता आहे. तर पिंपळस रामाचे गटात राष्ट्रवादीकडून राजेंद्र डोखळे, शिवसेनेकडून सुधीर कराड, भाजपकडून विलास मत्सागर, संदीप तासकर तर काँग्रेसकडून शाम शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सायखेडा गटात शिवसेनेचे डॉ.प्रल्हाद डेर्ले, खंडू बोडके, सुधीर शिंदे तर राष्ट्रवादीकडून सुरेश कमानकर, नंदू सांगळे, सोपान खालकर, वसंत जाधव, धोंडीराम रायते, राजेंद्र सांगळे, गणपत हाडपे तसेच भाजपकडून जगन कुटे, डॉ.सारिका डेर्ले, आदेश सानप तर काँग्रेसकडून माजी जि.प. उपाध्यक्ष दिगंबर गिते, मनसेकडून किरण सानप अशी मोठी यादी या गटात असून आता या गटाचे आरक्षण काय निघणार यावर मातब्बर नेत्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकूणच गट व गणाची निर्मिती झाल्याने इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोईचे ठरलेले हे गट प्रत्यक्ष निवडणुकीत या नेत्यांना विजयापर्यंत पोहचवतील का. तसेच गट व गणाचे आरक्षण काय निघणार यावर या नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com