कळवण उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका

कळवण उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका

कळवण । प्रतिनिधी

कळवण उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका मिळाली असून तिचे लोकार्पण आ. नितीन पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणेसमवेत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला आ. पवार, तहसीलदार बी. ए. कापसे, डॉ. शरद परदेशी, डॉ. प्रल्हाद चव्हाण व आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली आणि अडचणी जाणून घेतल्या. ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अभोणा ग्रामीण रुग्णालय येथेही भेटी देऊन पाहणी केली.

ग्रामीण व आदिवासी भागात करोनाचे संक्रमण भयानक स्थितीत जाऊन पोहोचल्यामुळे कोविड सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्याचे आतापासून नियोजन करा, आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून रुग्णांना वेळेवर औषधे द्या, कोणीही रुग्ण उपचार आणि औषधांविना परत जाणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना आ. पवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

आ. पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. कोविड सेंटरला होणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात दाखल रुग्णांना औषध पुरवठा होतो की नाही हे रुग्णांकडून जाणून घेतले आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेत कळवण तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेतला.

यावेळी आ. पवार यांच्या प्रयत्नातून कळवण उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी, डॉ. प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. आ. पवार यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता 18 पैकी फक्त चार सेवक उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे उर्वरित सेवक शिबिराच्या ठिकाणी गेले असल्याचे डॉ. बहिरम यांनी यावेळी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी आ. पवार यांनी जाणून घेत करोना संकटकाळात सर्व आरोग्यसेवकांनी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना आ. पवार यांनी केली. यावेळी मंगेश देसाई, दिगंबर पवार, देवा मोरे, ज्ञानेश्वर पवार, तुकाराम गोघडे आदी उपस्थित होते.

अभोणा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सुविधा, औषधे मिळतात का याची विचारणा केली. औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना करून रुग्णालयातील अधिकारी, सेवक उपस्थित आहेत का? हे जाणून घेत रुग्णालयाची पाहणी केली. अभोणा ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छता असल्याने नाराजी व्यक्त केली. स्वच्छता ठेवण्याची सूचना केली. यावेळी डॉ. दीपक बहिरम व सेवक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com