
करंजीखुर्द। वार्ताहर Karanjikhurda
तारुखेडले ( Tarukhedale )येथील वनविभागाच्या रोपवाटिकेकडे ( forest department nursery)वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष झाल्याने ही रोपवाटिका नामशेष झाली असून यामुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सदरची रोपवाटिका पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तारूखेडले येथे वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून यातील काही क्षेत्रावर वनविभागाने रोपवाटिकेची निर्मिती केली होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून वनविभाग प्रादेशिक कार्यालय येवला यांच्या अखत्यारित येत असलेली ही रोपवाटिका बंद झाल्याने परिसरातील शेकडोे कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला असून त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सदर रोपवाटिकेमुळे परिसरातील महिला व पुरुष मजुर या रोपवाटिकेत रोजंदारीने काम करीत होते. यात निंदणी, रोपे लावणे, रोपांना पाणी देणे, खत नियोजन यासह इतर कामांचा समावेश होता. परंतु आता या रोपवाटिकेत रोपे तयार केली जात नसल्यामुळे सदरचा परिसर हा भकास होवून काटेरी झुडपाने वेढला जावू लागला आहे.
गेल्या काही वर्षापूर्वी या रोपवाटिकेत चिंच, बदाम, गुलमोहर, आवळा, जांभूळ, निंब यासह फळझाडांची रोपे लावली जात होती. त्यासाठी लागणार्या पाणीपुरवठ्यासाठी वनविभागाने विहिरीसह पाण्याची टाकी बांधून या रोपवाटिकेचे रक्षण व्हावे म्हणून एका वन कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता रोपवाटिकाच बंद झाल्याने या परिसराकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा परिसर पुन्हा फळाफुलांनी बहरावा आणि परिसरातील मजुरांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी वनविभागाने ही रोपवाटिका पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत आहे.
रोपवाटिका सुरू करा
तारुखेडले गावातील रोपवाटिका म्हणजे रोजगाराचे एक माध्यम आहे. अनेक गरीब मजुरांना त्यामुळे रोजगार मिळाला. परंतु आता ही रोपवाटिका बंद झाली आहे. वनविभागाने रोपवाटिका रोजगार हमी अंतर्गत पुन्हा सुरु करावी. यासाठी निफाड तहसील कार्यालय यांना ग्रामपंचायतीचा ठराव तसेच निवेदन दिले आहे. त्यामुळे ही रोपवाटिका सुरू व्हावी अशी आमची मागणी आहे.
प्रशांत गवळी, तारुखेडले