लालपरी पुन्हा 'आर्थिक' जात्यात; दोन हजार कोटींची मागणी

लालपरी पुन्हा 'आर्थिक' जात्यात; दोन हजार कोटींची मागणी

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे आणि कडक निर्बंधामुळे एसटीचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षाही कमी झाले आहे. परिणामी एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली असून एसटीने आता राज्य सरकारकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. यातून कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्चासह दैनंदिन खर्च भागवला जाणार आहे...

मार्च २०२० पासून राज्यात करोनाचा विळखा वाढू लागला. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला. संसर्गाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली. त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे फक्त अत्यावश्यक सेवा आणि परराज्यात जाणाऱ्या कामगारांची वाहतूक केली.

टाळेबंदी शिथिल होताच एसटीची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली; परंतु उत्पन्न बुडाल्याने एक लाख कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले. त्या वेळी कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिन्यांचे वेतनही मिळत नव्हते.

अखेर राज्य सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास सुरुवात झाली. एसटीला २०२०-२१ साठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे एसटी तग धरू शकली. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला.

टाळेबंदी शिथिल होताच पुन्हा एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न काहीसे वाढू लागले; परंतु फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि त्याचा फटका एसटीला बसू लागला. करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे राज्यात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत गेली.

एसटीमधून १५ फेब्रुवारी रोजी ३३ लाख प्रवाशांनी प्रवास के ला होता. त्या वेळी १६ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते, तर मार्चच्या मध्यापर्यंत प्रवासी संख्या थेट २२ लाखांपर्यंत पोहोचतानाच दररोजचे उत्पन्न दहा कोट रुपयांपर्यंत गेले. त्यानंतर हा आलेख आणखी खाली होत गेला.

करोनापूर्व काळात एसटीतून दररोज ५८ लाख प्रवासी प्रवास करीत होते आणि दररोज २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते; परंतु या उद्दिष्टापर्यंत एसटी आता पोहोचूच शकली नाही. पुन्हा लागलेल्या टाळेबंदीमुळे एसटीवर आणखी आर्थिक संकटच कोसळले.

यातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी महामंडळाने केली आहे

वर्षभराचे नियाेजन

एसटी महामंडळाकडे सध्या १५ हजारपेक्षा जास्त गाड्या आहेत. महामंडळाला प्रतिमहिना २४० कोटी रुपयांचे इंधन लागते. टाळेबंदीत काही प्रमाणात गाड्या कमी धावत असल्या तरीही इंधन दर वाढल्याने त्याचा भारही एसटीला सोसावा लागला. त्यातच दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी २९० कोटी रुपये एसटीला लागतात. शिवाय प्रत्येक महिन्याला किरकोळ खर्च हा ५० ते ६० कोटी रुपये आहे. त्यामुळे किमान वर्षभराची तरतूद म्हणून दोन हजार कोटी रुपयांची मदत एसटीने राज्य सरकारकडे मागितली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com