
घोटी । प्रतिनिधी
घोटी शहरात धरणीमाता वृक्ष संगोपन संस्थेने गेल्या दोन वर्षात शहरातील डोंगरावर अनेक वृक्षांची लागवड करून संगोपन केले याच अनुषंगाने परिचय झाल्याने आज मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेता सयाजी शिंदे यांनी घोटी येथे येऊन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी काळात एकमेकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम व्यापक करू असा विश्वास अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. धरणीमाता वृक्ष संगोपन संस्थेच्या कामाचे अभिनेता शिंदे यांनी मनापासून कौतुक केले.
पेनगिरी येथे अत्यंत जुन्या वृक्षांची पाहणी करण्यासाठी जात असताना अभिनेता सयाजी शिंदे घोटीत भेट दिली. यावेळी औपचारिकरित्या अभिनेता शिंदे यांच्या हस्ते धरणीमाता ग्रुपने वृक्षरोप लागवड केली. आंबा व वडाच्या वृक्षारोपांची लागवड करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. माणूस जितका जगत नाही तितका आंबा, वड हे चारचारशे वर्ष जगत असल्याचे नमूद केले. वृक्ष लागवड मोहिमेत घोटीतील धरणीमाता ग्रुपचे भरीव योगदान आहे आगामी काळातही आपण एकमेकांच्या सहकार्याने ही मोहीम अधिक व्यापक करू असा आशावाद व्यक्त केला. आळंदी- पंढरपूर, देहू- पंढरपूर या वारी मार्गावर वृक्ष लागवड करून या मार्गावर सावली पेरण्याचे काम सुरू असल्याची माहितीही अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिली.
यावेळी धरणीमाता ग्रुप तथा संस्थेचे पदाधिकारी संदीप देशपांडे, विनायक शिरसाठ, पूनम राखेचा, राजेंद्र सुराणा, धीरज गौड, विजय देशमुख, यांच्यासह प्रभारी सरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, वैशाली गोसावी, विजय गोसावी आदी उपस्थित होते.