नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्या नाशिक नगरीतील रस्ते स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी जर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली तर शहरही सुंदर आणि निरोगी होईल. याकरिता शहरातील रस्ते सजवण्यासाठी वास्तुविशारद, नगररचनाकार व सामान्य नागरिकांनीही सहभागी होता येणार असून त्यांनी पुढे येऊन रस्ते सुंदर करण्याच्या कामामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.

करोना लॉकडाऊनच्या काळामध्ये ओस पडलेले रस्त्यांवरुन अनेकांनी पायी प्रवास करत आपले घर गाठले. हेच लक्षात घेत केंद्र सरकारने स्ट्रीट फॉप पीपल चॅलेंज आणले आहे. नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर या चॅलेंजमध्ये सहभागी झाले आहे. स्मार्ट सिटीज् मिशन, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अॅण्ड अर्बन अफेअर्स (चेकण), भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज राबविण्यात येत आहे. चाचपणी- शिक्षण- मुल्यमापन हे महत्त्वाचे सूत्र रस्ते सौंदर्यीकरणामध्ये वापरण्यात येणार आहे. कमीत कमी खर्चा बरोबरच कमी वेळामध्ये रस्ते कशाप्रकारे सुंदर होऊ शकतात, चालण्यायोग्य होऊ शकतात या बाबी फार महत्त्वाच्या आहेत.

रस्त्यांवरील जागेचा योग्य वापर, सुरक्षा, सोयीयुक्त, संवेदनशीलता, जीवनमान आणि पर्यावरणीय गोष्टींचा विचार करून स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. पायलट म्हणजे तात्पुरत्या स्वरुपाच्या साईट्स शोधणे, सार्वजनिक जागा (बाजार व ट्रान्झिट हब), तसेच पुनर्वसन वसाहती, आणि अनियोजित अल्प उत्पन्न अतिपरिचित क्षेत्रांचा समावेश आहे.

स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी नाशिक स्मार्ट सिटीने स्मार्ट पायलट रोड आणि मॅरेथॉन चौक ते केकाण हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता निवडला आहे. या रस्त्यांवर सौदर्यिकरण, तसेच हिरवळ, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी व वृद्धांना बसण्यासाठी काय आणि कसे करता येईल? यावर अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये या गोष्टी कशाप्रकारे पूर्ण करता येतील याबाबतही अभ्यास सुरू आहे. यासाठी आर्किटेक्ट, नगररचनाकार आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.

नाशिकमधील रस्ते सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन स्मार्ट सिटी करत आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागासाठी smartnet.niua.org/indiastreetchallenge/competition/ या लिंकवर अर्ज भरावा. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांबाबत आपली प्रतिक्रिया https://forms.gle/FgN8NytbqeDicxTo8 या लिंकवर क्लिक करा, असे आवाहन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.