देयके थकल्याने अमृत पोषण आहार बंद

अंगणवाडीतील बालकांसह गरोदर माता वंचित; आंदोलनाचा इशारा
देयके थकल्याने अमृत पोषण आहार बंद

देवळा । प्रतिनिधी | Deola

गेल्या दहा महिन्यापासून प्रलंबीत असलेल्या अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची (Abdul Kalam Amrit Ahar Yojana) देयके मिळत नसल्याने पोषण आहार पुरवणार्‍या देवळा तालुक्यातील (deola taluka) आंगणवाडी सेविकांनी (Anganwadi workers) अखेर वैतागून पोषण आहार वाटप (distribution of nutritious food) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेसांतर्गत असलेल्या अंगणवाडीतील बालके व गरोदर माता पोषण आहारापासून वंचित राहणार आहेत.

बालकांचे कुपोषण (Malnutrition) रोखण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनातर्फे (central government) गरोदर महिला व बालकांसाठी सदर योजना सुरू केली आहे. देवळा तालुक्यात एकूण 212 अंगणवाड्या असून त्यापैकी पेसांतर्गत 50 टक्के अंगणवाड्या आहेत. पेसांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांतील पोषण आहाराची मार्च 2020 पासूनची देयके थकली आहेत.

संबंधीत विभागाकडे वेळोवेळी देयकांबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi workers) केली आहे. या दहा महिन्यांच्या कालावधित अंगणवाडी सेविकांनी पदरमोड करून योजना सुरू ठेवली. आज ना उद्या पैसे येतील; या अपेक्षेवर पोषण आहारासाठी त्यांनी स्वतःचे मानधन तसेच स्थानिक किराणा दुकानात उधारी करत आतापर्यंत वेळ निभावत योजना सुरू ठेवली.

परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. किराणा दुकानदारांपासून तोंड लपवण्याची वेळी अंगणवाडी सेविकांवर आली असून त्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. पोषण आहारासाठी पैसे उपलब्ध करणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी पोषण आहार वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास बालकांसह गरोदर मातांच्या पोषण व आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहे.

भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण (BJP taluka president Kishore Chavan) यांनी अंगणवाडी सेविकांसह गटविकास अधिकारी राजेश देशमुख व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांची भेट घेत अंगणवाडी सेविकांची कैफियत मांडली व निवेदन दिले. निवेदनात चव्हाण यांनी संबंधित विभागाकडे सदर योजनेचा निधी पडून असताना देखील गेल्या दहा महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना देयके अदा केली नसल्याचा आरोप केला आहे.

अंगणवाडी सेविकांची थकित बिले त्वरीत अदा करण्याची मागणी त्यांनी केली असून हयगय झाल्यास बालविकास प्रकल्प कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. यावेळी देवळा तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा जिजाबाई अहिरराव व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

अमृत पोषण आहार निधी मागणीचे प्रस्ताव यापूर्वीच वरिष्ठांकडे सादर केलेले आहेत. दोन महिन्यांचे पैसे प्राप्त झाले असून ते अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरीत देयकांसाठी निधी प्राप्त झाल्यावर अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा होतील.

जयश्री नाईक, बालविकास प्रकल्प अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com