राष्ट्रवादीचे मनपा उपायुक्तांना निवेदन; उपोषणाचा इशारा

राष्ट्रवादीचे मनपा उपायुक्तांना निवेदन; उपोषणाचा इशारा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड ( Nashikroad )व परिसरातील 25 खेड्यांसाठी आधार ठरलेले नवीन आणि जुन्या बिटको रुग्णालयात ( Old Bytco Hospital )गरोदर महिला, दिव्यांग व गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. महासभेत अनेकदा समस्या मांडून व आयुक्तांना निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाने (NCP )दिला आहे. पक्षातर्फे उपायुक्त अत्राम यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दहा महिन्यांपासून रेडिओलॉजिस्ट नसल्याने गरोदर महिला व इतर रुग्णांची बिटकोमध्ये सोनोग्राफी होत नाही. गरोदर महिलांना कठीण अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. काही वेळा खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने त्यांना जादा शुल्क मोजावे लागते. रुग्णांच्या जीवाशी रोज खेळ सुरु आहे. बिटकोमध्ये डॉक्टर, सिस्टर व इतर कर्मचारी चांगली सेवा देतात. मात्र, योग्य सोयी सुविधा मिळत नाही.

बिटकोत महापालिकेची स्वतःची लॅब, कृष्णा ही खासगी लॅब आणि राज्य सरकारची महालॅब आहे. मात्र, तिन्ही लॅबचे रिपोर्ट वेळेत मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. कृष्णा लॅब रुग्णांना त्यांचे सलाईन काढून वरील मजल्यावरून सॅम्पलसाठी बोलावले जाते. मानधनावरील वैद्यकीय अधिकारी, सीएमओ व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. त्यांना नियुक्ती पत्रही वेळेत मिळत नाही. त्यामुळे ते काम सोडून जात आहेत.

अस्थिरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ञ पगार न झाल्याने काम सोडून गेले आहेत. तरी प्रशासन गांभीर्यीने दखल घेत नाही. महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांचेही पगार वेळेत होत नाही. नवीन बिटकोत नवीन एमआयआर मशिन आहे. मात्र, ते चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्ट व टेक्निशियन नसल्याते ते धूळखात पडले आहे. एचआरसीटी, सीटी, एक्स रे मशिनही बंद आहे. ईसीजी टेक्निशियन नाही. त्यामुळे गरोदर महिला, दिव्यांग व अन्य रुग्णांच्या हालामध्ये भर पडली आहे.

बिलबुक व अन्य स्टेशनरी नाही. कर्मचारी स्वखर्चाने स्टेशनरी आणत आहेत. जनरल ओपीडीमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून ती वाढवावी. कोविड काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांना कायम सेवेत घ्यावे. ठेकेदारी भरती करु नये. दोन्ही बिटकोमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने अतिताणामुळे कर्मचारी आजारी पडत आहेत. दिव्यांगांना अपंगत्वाच्या दाखल्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. निवासी वैद्यकीय अधिकारी प्रभारी नको.

आवश्यक मशिनरी तसेच नेत्र, आर्थो व एनटी सर्जन, डेन्टिस्ट नसल्याने प्रमुख शस्त्रक्रिया होत नाहीत. औषधांचाही तुटवडा भासत आहे. नवीन बिटकोत महत्वाची सुविधा नसतानाही जुन्या बिटकोतील ओपीडी तेथे नेण्यात आली आहे. जुन्या बिटकोत हृदयरोग तज्ञ नसल्याने टीबी, बीपी, शुगर तपासणी, सर्पदंश, गरोदर महिलांची तपासणी एमबीबीएस व बीएएमस डॉक्टर करतात. औषधे तेच लिहून देतात. अस्थिरोग तज्ञ असूनही फ्रॅक्चर रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बाहेरून साहित्य आणावे लागते.

जुन्या बिटकोत बालकांसाठीच्या ऑक्सिजनच्या पेट्या कमी असून काही बंद आहेत. नेत्र शस्त्रक्रिया जुन्या बिटकोत होणार नाही, तुम्ही झाकीर हुसेन रुग्णालयात जा असा सल्ला दिला जातो. सहा महिन्यांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत नाही. जुन्या बिटकोत कान, नाक, घसा तज्ञ नाही. रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. ब्लड बँकेत बीटीओ कायमस्वरुपी नेमावा. एमडी फिजीशयन नसल्याने जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. जिल्हा रुग्णालयात जाताना अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. जुन्या बिटकोत पोलिस चौकी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पवार, नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, योगेश निसाळ जिमी देशमुख, मंगेश लांडगे, रितेश केदारे, सुरेश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com