नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

उत्तमनगर परिसरात अनेक दिवसांपासून ड्रेनेज ची पाईपलाईन चे काम सुरु आहे. हे काम सुरु असल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांचे खुपच नुकसान होत आहे. या रस्त्याच्या कामाचे नियोजन दिसून येत नसून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर रांगोळी काढून अनोख्यापद्धतीने आंदोलन करण्यात आले.

उत्तम नगर येथील बुद्ध विहार ते ओम स्वीट पर्यंत ड्रेनेज लाईनचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. सदरच्या कामाचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नसल्याने याठिकाणी वाहतुक कोंडीबरोबरच धुळी मुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या कामामुळे येथील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या धुळीमुळेच हे नुकसान हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी धूळ उडू नये म्हणून टँकर द्वारे पाणी टाकण्यात येत असून यामुळे येथे चिखलाचे साम्राज्य देखील तयार झाले आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय असून याठिकाणी कायमच वर्दळ दिसून येत असते. शाळा, महाविद्यालय सुरु होतांना व सुटतांना याठिकाणी वाहतुक कोंडी होतच असते त्यात आता हे काम सुरु असल्याने वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.

तसेच हे काम किती दिवसात पूर्ण होणार, किंवा हे काम कोणत्या वेळेत केले पाहिजे याची कोणतीही माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी उत्तमनगर येथील रस्त्यावर रांगोळी काढून व काळे फलक लावून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष विशाल डोखे,,कृष्णा काळे, पुष्पा राठोड, मनोज हिरे, वंदना पतीलब, किशोरी गायकवाड, अक्षय पाटील, अजय पाटील, रोहित पाटील, बाळासाहेब जमधडे, सुनील घुगे, करण आरोटे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून उत्तमनगरच्या रस्त्याचे काम सुरु असून याठिकाणी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. आता हा रस्ता फोडला म्हणून तर काही दिवसांनी ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण सुरु होईल. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.
विशाल डोखे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पश्चिम विधानसभा