नाशिक | प्रतिनिधी

पुढील वर्षभरात येऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून नाशिक महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू असा निर्धार राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून एकला चलो चारा नारा दिला आहे.

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका नाशिक येथे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी एकमुखाने आगामी महापालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी अशा भावना व्यक्त केल्या.

नाशिक महानगरपालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवून देखील नाशिक शहरातील नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. अशा परिस्थितीत नेहमीच राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाच्या वतीने आवाज उठवून नाशिककरांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील जनता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अशोक सावंत, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नाशिक महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, मनोहर कोरडे, मुख्तार शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.