कांद्याला हमीभाव मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

कांद्याला हमीभाव मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

नाशिक  | Nashik

राज्यात सध्या कांद्याचा (Onion) प्रश्न चांगलाच गाजत असताना, कांद्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा वांदा करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) बैठक आयोजित केली होती.

कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे म्हणून, भाजप सरकारने मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने 'बाजार हस्तक्षेप योजना' लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार (Ravindra Pagar) यांनी यावेळी व्यक्त केले.

नाशिक जिल्हयातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची आढावा बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे संपन्न झाली त्याप्रसंगी पगार बोलत होते. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही (Vegetables) भाव रसातळाला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना धीर द्यावा असेही बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार, माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे, तालुकाध्यक्ष सर्वश्री राजेंद्र डोखळे (निफाड), विजय पाटील ( नांदगाव), डॉ. सयाजी गायकवाड (चांदवड), राजेंद्र भामरे (कळवण), दामू राऊत (पेठ ), भास्कर भगरे (दिंडोरी), संदीप पवार (मालेगाव ), राजेंद्र सोनवणे (सटाणा), दिलीप पाटील (देवळा) यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com