निसर्ग चक्रीवादळ :  नूकसान ग्रस्तांची भरपाईसाठी  प्रतीक्षा
नाशिक

निसर्ग चक्रीवादळ : नूकसान ग्रस्तांची भरपाईसाठी प्रतीक्षा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जूनच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात धुमाकुळ घालत पीकांचे व पशुधनाचे मोठे नूकसान केले होते. त्यास दीड महिना होऊन तरी पशूधन वगळता घरपडझड व पीक नुकसानीची मदत मिळणे बाकी आहे. नूकसान भरपाईसाठी ३ कोटींची मागणी जिल्हाप्रशासनाने केली होती. त्यापैकी पशुधन नुकसानीची ११ लाखांची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. उर्वरीत घर पडझड व पीक नूकसान भरपाई याची अद्याप प्रतीक्षा आहे.

मागील महिन्यात ३ जूनला कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रिवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या वादळाने जिल्ह्याला मोठा तडाखा दिला होता. ५३० हेक्टरवरील पिके आडवी झाली होती. जोरदार वारा व मुसळधार पाऊस यामुळे घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे अनेकजण उघडयावर आले. लॉकडाऊन काळात पशूधन हे शेतकर्‍यांसाठी उदरनिर्वाहचे मोठे साधन होते. पालकमंत्री भुजबळ यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण करत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवला होता. त्यापैकी पशुधन नुकसानिची मदत भरपाईचे ११ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

लहान जनावरे कोंबडी, शेळी, मेंढया व बोकड यांच्यासाठी ३ हजार रुपये नूकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर बैल, गाय, म्हैस, गाढव, खेचर या मोठया जनावरांसाठी ७ ते ७ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. दरम्यान, पीक नूकसान व घरांची पडझडीची नूकसान भरपाई प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. मात्र करोना संकटामुळे उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प असून उत्पन्नाअभावी तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे शासनाकडून मदत प्राप्त होण्यास विलंब होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com