पद्मश्री नव्हे ही तर 'पागल स्त्री'; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कंगनावर टीका

पद्मश्री नव्हे ही तर 'पागल स्त्री'; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कंगनावर टीका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सन १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती, तर खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले' असे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) 'पद्मश्री' नाही तर 'पागल स्त्री' आहे. त्यामुळे तिला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती राष्ट्रवादी महिला काँग्रेस (Nationalist Women's Congress) नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamare) यांनी केली आहे...

सन १८५७ पासून ते १९४७ पर्यंतच्या कालखंडात लाखो स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास माहित असतानादेखील केवळ भाजपचे (BJP) लांगूलचालन करण्याकरिता कंगना राणावतसारखी स्त्री १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होती तर खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वक्तव्य करते.

यावरून तिची बौद्धिक पात्रता लक्षात येते. एकतर ती भाजपला जाणूनबुजून खुश करण्यासाठी असे वक्तव्य करते किंवा ती बिनडोक आहे, असे तरी तिच्या वागणुकीतून दिसते. तेव्हा तिला वेड्यांच्या रूग्णालयात भाजपच्याच लोकप्रतिनिधींनी दाखल करावे, अशी विनंती नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

कंगना राणावतच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी सरकारकडे होत आहे. यापूर्वी कंगणाने शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले तर मुंबईतील आपल्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवला तेव्हा मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून संबोधले.

भाजपचे तिच्याविषयी असलेले अतूट प्रेम पाहता केंद्र सरकार (Central Government) पद्मश्री पुरस्कार परत घेईल किंवा तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करेल, अशी शक्यता दिसत नाही. तेव्हा किमान कंगनाला वेड्यांच्या रुग्णालयात तरी दाखल करा, जेणेकरून तिच्याकडून भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com