हिरेंच्या निर्णयाने राष्ट्रवादीत अस्वस्थता

हिरेंच्या निर्णयाने राष्ट्रवादीत अस्वस्थता

मालेगाव । मंत शुक्ला Malegaon

गटबाजीच्या उदंडतेमुळे पक्षात निर्माण झालेली मरगळ झटकण्यासाठी भाजपचे (bjp) संकटमोचक ठरलेल्या आ. गिरीश महाजन (girish mahajan) यांनी युवकनेते अव्दय हिरेंना (Avday Hirey) पुन्हा सक्रिय करत बुस्टर डोस दिला आहे. हा निर्णय गटबाजीने त्रस्त भाजपा कार्यकर्त्यांना (BJP workers) उत्साहीत करणारा ठरला असला तरी हिरेंच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (nationalist congress) अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा (assembly) डोळ्यासमोर ठेवत होवू घातलेल्या बाजार समितीसह (market committee) जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (panchayat samiti), शेतकी संघ, मनपा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Government Institutions) निवडणुकांमध्ये (election) आपल्या गडाची तटबंदी मजबूत राहावी ती ढासळू नये यासाठी हिरेंना देखील सक्रिय होणे क्रमप्राप्त होते. शिवसेनेचे (shiv sena) कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांचे राज्य असो की स्थानिक पातळीवर महाआघाडीतील नेत्यांशी असलेले चांगले ‘सख्य’ पाहता भविष्यात अधिक अडचण नको या भुमिकेतून अव्दय हिरे यांनी

विरोध नसलेल्या भाजपातच पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिरे सक्रिय नसल्याने होवू घातलेल्या निवडणुका एकतर्फी होण्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. मात्र हिरेंच्या सक्रियतेने या चर्चांना पुर्णविराम बसला आहे. आगामी निवडणुका भाजप संपुर्ण ताकदिनिशी लढेल व जिंकेल हे हिरेंनी केलेले वक्तव्यच निवडणुका अटीतटीच्या व रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट करणारे ठरले आहे.

भाजप गटनेते सुनिल गायकवाड (sunil gaikwad) यांच्याशी झालेल्या वादामुळे अव्दय हिरे यांनी पक्षात सक्रिय राहणे टाळले होते. वडिल माजीमंत्री प्रशांत हिरे व बंधू माजी आ. अपुर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला परंतू अव्दय हिरेंनी प्रवेश करणे टाळले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) आघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचा प्रचार करण्याचा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना त्यांनी दिला होता व तो त्यांनी पाळत स्थानिक नेत्यांसह प्रचाराचा झंझावात निर्माण करत

शिवसेनेचे दादाजी भुसे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. विजयासाठी आवश्यक असलेले अंतीम टप्प्यातील ‘नियोजन’ करण्यास टाळले गेल्याने नाराज झालेले हिरे बंधूंच्या सहाय्यासाठी नाशिक (nashik) येथे निघून गेले होते. हातात आलेला विजय भुसेंच्या ताटात टाकला गेल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोलून दाखवत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. खा. शरद पवार यांना शब्द दिल्यामुळेच डॉ. शेवाळेंचा प्रचार हिरेंनी केला. मात्र निवडणूक पार पडताच महाआघाडीशी दोन हात लांब राहणे त्यांनी कटाक्षाने पाळले होते.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. ज्यांच्या विरोधात सभा गाजविल्या त्यांच्या समर्थनार्थ बोलायचे तरी कसे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. सत्ता येवून देखील आमची कामे होत नाही अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांतर्फे आता उघडपणे केली जात आहे.

सेनेच्या मंत्रीपदाचा लाभ शिवसैनिकांनाच (shiv sainik) होत असल्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंथन केले गेले होते. अव्दय हिरे भुसेंच्या विरोधात उभे ठाकतील हे स्वबळाचा नारा देतांना राष्ट्रवादी नेत्यांतर्फे गृहीत धरले गेले असावे मात्र हिरेंनी भाजपात सक्रिय राहण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मात्र सत्ता प्राप्तीसाठी झालेल्या या महाआघाडीचा प्रयोग भविष्यात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महाआघाडीचे राज्य पातळीवर नेते असो की स्थानिक पातळीवरील त्यांच्याशी चांगले संबंध कृषिमंत्री भुसे यांनी प्रस्थापित केले आहे. या संबंधांचा वेळोवेळी त्यांना लाभ देखील झाला आहे. त्यामुळे भविष्यात विधानसभा निवडणूक लढवायची झाल्यास झारीतील एक नव्हे अनेक शुक्राचार्य अडचण निर्माण करू शकतात व अशावेळेस इतर पक्षात जाण्यासाठी परतीचे दोर कापलेले असतात याचा अनुभव हिरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी घेतला होता.

ते उमेदवारीसाठी इच्छूक असतांना भाजपतर्फे खा.डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. हे अनुभव पदरी असल्याने त्यांनी वेळीच सावध होत पुन्हा भाजपातच सक्रिय होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले उचलण्यास गत काही दिवसांपासून प्रारंभ केला होता. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांची त्यांनी भेट देखील घेतली होती. तसेच ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्याशी चर्चा देखील केली होती. या दोन्ही नेत्यांनी हिरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तालुक्यात हिरेंची मोठी शक्ती आहे. गटबाजीमुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी हिरेंची सक्रियता पक्षाच्या पथ्यावर पडणारी असल्याने विरोध करण्याचे कारण नव्हते.

गटबाजीने पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी सुनिल गायकवाड व अव्दय हिरे यांचे मनोमिलन होणे गरजेचे होते. तालुक्यात हिरे यांचे प्रभुत्व असले तरी गटनेते सुनिल गायकवाड यांनी देखील संपुर्ण ताकद पणास लावत मनपात 9 नगरसेवक निवडून आणण्याचा चमत्कार करून दाखवला होता. तालुक्यात देखील गायकवाड यांचे चांगले प्रस्थ आहे.

त्यामुळे पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेत सुनिल गायकवाड व अव्दय हिरे हे दोन्ही नेते एकत्र करण्याचा विडा उचलला. जळगाव येथे झालेल्या बैठकीत हिरे-गायकवाड यांच्यातील मतभेद संपुष्टात आणून निवडणुकांची संपुर्ण धुरा अव्दय हिरेंकडे सपुर्द करण्याचा निर्णय आ. गिरीश महाजन व आ. जयकुमार रावल यांनी घोषीत केला आहे. आगामी सर्व निवडणुका एकदिलाने लढवित पक्षाला यश मिळवून देण्याचा निर्धार हिरे-गायकवाड यांनी जाहिर केला. या दोन्ही नेत्यांच्या सक्रियतेमुळे शहर व तालुक्यात शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार असल्याचे निश्चित आहे.

पक्षात पुन्हा सक्रिय होतांना हिरे यांनी विधानसभा उमेदवारीचा शब्द घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तालुक्यातील काही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांव्दारे जनसंपर्क अभियान राबवत आहे. आत्ताच मनसुबा जाहिर केल्यास कार्यकर्त्यांना अडचण-त्रास नको यामुळे या नेत्यांनी आपल्या गुपिताबाबत मौन बाळगले असले तरी शिवसेना सोडून ते कुठल्याही पक्षात सक्रिय होवू शकतात. त्यामुळे शितावरून भाताची परिक्षा या उक्तीनुसार हिरेंनी उमेदवारीचा शब्द पक्ष नेत्यांकडून घेतल्याचे बोलले जाते.

हिरे यांच्या सक्रियतेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. खा.डॉ. सुभाष भामरे यांनी देखील हिरेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम तसेच मनपा गटनेते सुनिल गायकवाड यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत पक्षात सक्रिय झालेल्या हिरेंचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाध्यक्ष निकम यांनी सत्काराच्या कार्यक्रमात आपण वयोमानानुसार आता निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट करत मार्गदर्शकाची भुमिका पार पाडणार असल्याचे सांगून टाकले.

सक्रिय होण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पक्षातून स्वागत केले गेल्याने हिरेंना मोठा दिलासा मिळाला असेल. परंतू गटबाजीने विखुरलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे शिवधनुष्य आगामी काळात त्यांना उचलावे लागणार आहे. गड जिंकण्यासाठी तटबंदी मजबूत असणे गरजेचे असते. गटबाजीने त्रस्त पक्ष कधी विजयाचा शिल्पकार होवू शकत नाही हे सांगण्यास कुणा भविष्यवेत्याची गरज नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com