जंतविरोधी मोहिमेस प्रारंभ

जंतविरोधी मोहिमेस प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ( Health Dept of Zilla Parishad ) राष्ट्रीय जंतनाशकदिन (National Deworming Day )साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शालेय वयोगटातील बालकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांच्या पोटातील जंत औषध देऊन नष्ट केल्यास बालकांच्या विकासामध्ये फार मोठा बदल घडून येतो. यासाठी ही राष्ट्रीय जंतविरोधी मोहीम दरवर्षी सहा महिन्यांनंतर राबवण्यात येते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय जंतनाशकदिन साजरा करण्यात आला. यामध्ये अलबेंडाझोल जंतविरोधी गोळी देण्यात आली. ही गोळी अंगणवाडी, शासकीय शाळा, खासगी शाळा, महाविद्यालय यामध्ये 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलांना देण्यात आली.

गैरहजर असलेल्या मुलांना 29 एप्रिल 2022 रोजी मॉपअप राऊंडमध्ये गोळी देण्यात येणार आहे. याशिवाय राहिलेल्या बालकांना 2 मेपर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण करून घरोघरी जाऊन ही गोळी देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 लाख 85 हजार 554 लाभार्थी तसेच नगरपालिका क्षेत्रातील 99,957 लाभार्थी जंतविरोधी अलबेंडाझोल गोळी प्रत्यक्ष खायला देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 3461 आशा, 5096 अंगणवाडी, 3790 शासनमान्य शाळा, 450 खासगी शाळा, 64 महाविद्यालये यामध्ये सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमाचे संनियंत्रण जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांच्यातर्फे करण्यात येत असून जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 592 उपकेंद्रेअंतर्गत काम करणारे आरोग्यसेवक-सेविका यामध्ये सहभागी आहेत.

लीना बनसोड यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वरील तारखेला आपल्या घरातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना शाळेमध्ये ही गोळी देण्यात येणार आहे किंवा शाळाबाह्य एखादे बालक असल्यास त्याला जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा शाळेमध्ये जाऊन जंतविरोधी गोळी न विसरता घ्यावी तसेच आपल्या घरात अथवा परिसरात 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना ही गोळी मिळाली का नाही याविषयी पालकांनी जागरुक राहून ही गोळी देण्यात यावी.

एखाद्या मुलास गोळी मिळाली नाही तर 29 तारखेच्या मॉपअप राऊंडला न विसरता घेण्यात यावी व आरोग्य विभागाला या कार्यक्रमात सहकार्य करावे. शंभर टक्के मुलांना जंतविरोधक गोळी मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.