राष्ट्रीय पक्षी मोराची नांदगावात हत्या; घटनेने खळबळ

राष्ट्रीय पक्षी मोराची नांदगावात हत्या; घटनेने खळबळ
न्यूज अपडेट २/News update 2न्यूज अपडेट २/News update 2

नांदगांव | प्रतिनिधी | Nandgaon

राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या (Peacock Kill) करणाऱ्या दोघा संशयितांना पोलीस (Police) व वनविभागाने (Forest Department) संयुक्त कारवाई करत नांदगाव तालुक्यातील दऱ्हेल, भार्डी व धनेर शिवारातून ताब्यात घेतले...

जनावरे चोर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेले मुद्स्सीर अहेमद अकिल अहेमद, जाहिद अक्तर सईद अहेमद (रा. मालेगाव) हे दोघे संशयित सराईत गुन्हेगार असून नाशिकच्या येवला, मालेगाव, नांदगाव आदी वनविभागाच्या ठिकाणी त्यांच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. या दोघा संशयितांकडून मृतावस्थेतील मोर व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात सध्या जनावरे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. या चोरांच्या मागावर पोलिस व नागरिक दोन्हीही असताना तालुक्यातील दऱ्हेल, भार्डी व धनेर शिवारातील जनावरे चोरून चोरटे पसार होत असतांना ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला.

परिसरात गस्तीवर असलेले नांदगांव पोलीस ठाण्याचे (Nandgaon Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर (Deepak Survadkar) यांना याबाबत माहिती दिली. दोन संशयित याच दरम्यान तिथे आले व हिंदी बोलू लागल्याने ग्रामस्थांना हे जनावरे चोरच असल्याचा संशय आला. ग्रामस्थांनी त्या दोघांना पकडून ठेवले.

सहा. पोलीस निरीक्षक सुरवडकर यांनी या दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच त्या दोघांनीही जनावरे चोरली नसून मोराची शिकार केल्याचे सांगितले. यावेळी या चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मृतावस्थेतील मोर पक्षी, लोखंडी बॅरेल असलेली बंदूक, बुलेट्सची डबी (गोळ्या), कोयता, सुरा, लायटर, विद्युत टेस्टर, कटर, सर्च लाईट, ऑईल बॉटल आदी शिकार करण्याचे साहित्य मिळाले.

याबाबत वनविभागाला कळवण्यात येऊन शिकारीचे साहित्य व दोन्ही संशयितांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे दोघे संशयित सऱ्हाईत गुन्हेगार असून यापूर्वीही काळवीट शिकार प्रकरणी त्यांच्यावर नाशिकच्या मालेगाव, नांदगाव, येवला तालुक्यातील वनविभागाकडे गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईत वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार, वनपाल तान्हाजी भुजबळ, अशोक सोनवणे, मगन राठोड, दीपक वडगे, वनरक्षक राजेंद्र दौंड, नाना राठोड, अजय वाघ, प्रफुल्ल पाटील, सुरेंद्र शिरसाठ, चंद्रकांत मार्गेपाड, रवींद्र शिंदे, पोलीस हवालदार सावकारे, नंदकिशोर पिंपळे आदी सहभागी होते.

दरम्यान, दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.