नाशिकची लालपरी मुंबईला; कर्मचारी नाराज

नाशिकची लालपरी मुंबईला; कर्मचारी नाराज

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

मुंबईतील बेस्ट उपक्रमाला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मदतीचा हात दिला आहे. मुंबई शेजारील जिल्ह्यांतून बस आणि सेवक मुंबईला पाठविले जात असून मुंबईत बेस्टसाठी सेवा बजावण्यास नकार देणार्‍या सेवकांवर महामंडळाने निलंबनाच्या कारवाईचा धडाका सुरू केल्याचे समजते आहे.

त्यामुळे सेवकांत खळबळ उडाली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सामन्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबईत प्रवासी वाहतूक करणार्‍या बेस्टवर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईजवळील नाशिक, पालघर, रायगड, तसेच पुणे येथील बस बेस्टच्या मदतीला बोलविण्यात आल्या आहेत.

राज्यभरातून एक हजार बस मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मात्र मुंबईत पोचलेल्या सेवकांना किमान सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशात सेवेला नकार देणार्‍या नाशिक जिल्ह्यातील काही सेवकांना नोटिसा बजावल्याचे समजते.

नाशिक विभागातून 70 बस, तर 140 वाहक आणि तेवढेच चालक मुंबईत पोहचले आहेत. मागणी मोठी असल्याने नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणार्‍या सेवकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे कळते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com