
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहराचे सौंदर्य खुलवण्यासाठी 240 कोटी रुपये खर्च करून शहरातील 12 प्रमुख मार्ग मॉडेल रोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रामुख्याने मॉडेल रोड करताना मोठे रस्ते विचारात घेतले जाणार आहेत. त्यात थोड्या अंतराने भूमिगत पाईप टाकण्यात येणार आहेत. जेणेकरून भूमिगत केबल्स किंवा तारा टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची गरज राहणार नाही.
पादचार्यांसाठीही रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फूटपाथ बांधण्यात येणार आहेत. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी शहरातील महत्त्वाच्या 12 रस्त्यांचे मॉडेल रोडमध्ये रूपांतर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. शहरातील हे रस्ते मोठे व मॉडेल रोड या नावाने ओळखले जाणे आवश्यक आहे. या रस्त्यांची पाहणी करून लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार आहे.
या मॉडेल रोडचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा मनपा प्रशासनाचा विचार आहे. नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड, पूर्व, पश्चिम, पंचवटी या सहा विभागांत प्रत्येकी दोन प्रमुख रस्त्यांचे रूपांतर मॉडेल रोडमध्ये केले जाणार आहे.
24, 30 मीटर रुंदीचे रस्ते
24 मीटर आणि 30 मीटर रुंदीचे रस्ते यासाठी निवडण्यात येणार आहेत. या प्रत्येक मॉडेल रस्त्याची लांबी किमान पाच कि.मी. असेल. प्रत्येक मॉडेल रस्त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च येणार आहे. अर्थसंकल्पात प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतूद असलेल्या अनेक विकासकामांना महापालिकेने कात्री लावली आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांत मालमत्ता आणि पाणी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या महसुलातही वाढ झाली आहे. महापालिकेला शहरासाठी आवश्यक असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करून अनावश्यक कामांना आळा घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात काही मोठे रस्ते आहेत. या रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करून रस्ता तयार करताना त्यात पाईपलाईन टाकल्यास वेळोवेळी रस्ता फुटणार नाही. आकर्षक फूटपाथ तसेच विद्युतसह इतर कामे झाल्यास या रस्त्यांचा नागरिकांना चांगला उपयोग होईल.
रमेश पवार, मनपा आयुक्त