‘इलेक्रामा’तून नाशिकच्या उद्योगांना गती

‘इलेक्रामा’तून नाशिकच्या उद्योगांना गती

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

दिल्ली ( Delhi)येथे नुकत्याच झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय 'इलेक्रामा- 2023'( 'Elecrama-2023') प्रदर्शनात नाशिकच्या उद्योजकांनी सहभाग नोंदवत त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्याच्या परिणाम स्वरूप आगामी काळात नाशिकच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर गती मिळणार असल्याची माहिती आयमाचे ( AIMA)अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

नवी दिल्ली येथील प्रदर्शनात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आदी उत्पादनात दिग्गज असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादक सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला नाशिकच्या तब्बल 50 ते 60 उद्योगांचे स्टॉल लावण्यात आले होते. या खेरीज नाशिकच्या सुमारे 400 ते 500 उद्योजक, नवउद्योजकांनी याठिकाणी भेट देऊन आपल्या उद्योगाला आवश्यक असलेल्या उद्योगांशी संपर्क साधून आपला व्यवसाय त्यांच्यासमोर मांडत व्यवसायाच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद मिळवला.

नवनवीन तंत्रज्ञानाचा नाशिकच्या उद्योजकांनी येथे अभ्यास करून नाशिकमध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याकरिता संपर्क मिळवला. करोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी सदरहू प्रदर्शन झाल्याने जगभरातून लाखो उद्योजकांनी येथे सहभाग नोंदवल्याने नाशिकमधील उद्योजकांचे जुने व नवीन सप्लायर्ससोबत काही करारही यावेळी करण्यात आल्याने नाशिकच्या उद्योगांना आता स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता जागतिक बाजारपेठेत जाण्याची संधी याठिकाणी मिळाली. नाशिकच्या शेकडो उद्योजकांसह आयमाचे शिष्टमंडळदेखील या प्रदर्शनात सहभागी झाल्याने आगामी काळात उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयमा पुढाकार घेणार असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com