करोना काळातही नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा साता समुद्रा पार

9 कंटेनरद्वारे 124 मे. टन द्राक्ष निर्यात
करोना काळातही नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा साता समुद्रा पार

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

नाशिकच्या द्राक्ष हंगामाला 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाल्यानंतर दुसरा 28.600 मॅट्रिक टनांचा कंटेनर युनाईटेड किंडम साठी रवाना झाला आहे. 1 जानेवारी पासून 11 जानेवारी पर्यंत 9 कंटेनर द्वारे 124 मॅट्रिक टन द्राक्ष जर्मनी आणि युकेला निर्यात झाली आहे.

मागील द्राक्ष हंगाम 2019-20 मध्ये 11 जानेवारी पर्यंत 27 कंटेनर मधून 363 मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपमध्ये पुन्हा संचारबंदी असल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्ष निर्यात अजूनही पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2018-19 हंगामात तब्बल 2 लाख 46 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 2335 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत कैलास भोसले यांनी व्यक्त केले आहे.

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी देशांत पाठविण्यात येतात. जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहावी यासाठी कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती केली. तसेच निर्यातीसंबंधीचे निकष तपासून काटेकोरपणे कामकाज पार पाडले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे 45 हजार 14 द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली.

भारतीय शेतमाल आणि फळबागेला बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने बांगलादेश मध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्युटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल. गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे.

गेल्या वर्षी करोनामुळे द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावत ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे.

द्राक्ष अधिकाधिक निर्यात होणे आवश्यक

गेल्या वर्षी करोनामुळे द्राक्ष निर्यात करणार्‍या शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्ष अधिकाधिक प्रमाणात निर्यात होणे आवश्यक आहे. कारण निर्यात वाढल्यामुळे लोकल द्राक्षांना मागणी वाढेल तसेच त्यांचे दर देखील वाढतील. निर्यात वाढवण्यासाठी शासनाकडून शेतकर्‍यांना सवलत, प्रोस्ताहन तसेच रेसिड्यू आणि सर्टिफिकेट साठीची जलद सेवा मिळणे आवश्यक आहे. द्राक्ष उत्पादक संस्था तसेच संशोधन केंद्रातून निर्यात साठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

सचिन होळकर, कृषीतज्ज्ञ (लासलगाव)

द्राक्ष निर्यात आलेख

2017-18 : 188221 मेट्रिक टन (1900 करोड)

2018-19 : 246133 मेट्रिक टन (2335 करोड)

2019-20 : 193690 मेट्रिक टन (2177 करोड)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com