नाशिकचा देवराई प्रकल्प कागदावरच!
नाशिक

नाशिकचा देवराई प्रकल्प कागदावरच!

पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था ठरल्या सरस

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेकडून शहरातील पर्यावरण व जैवविविधता टिकवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नाशिक देवराई प्रकल्पाला करोनाचा मोठा फटका बसला आहे. शहरातील सहा विभागात प्रत्येकी एक अशा सहा देवराई प्रकल्पांकडे भूमिपूजनानंतर दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांची दुरवस्था झाली आहे.

सह्याद्री देवराईचे प्रणेते सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना महापालिकेने दिलेला शब्द पाळला नसून यातून महापालिकेची उदासीनता समोर आली आहे. दरम्यान, शहरातील पर्यावरणप्रेमींच्या संस्थेने उत्तमरीत्या देवराईला सांभाळत दुसरा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला.

नाशिकनगरी पुरातन काळापासून वृक्ष-वनराईने नटलेला प्रदेश असल्याचा उल्लेख पुरातन ग्रंथात असून दंडकारण्य म्हणून नगरीची ओळख आहे. काळाच्या ओघात तंत्रनगरीचे रुपांतर यंत्रनगरीत होऊन याठिकाणी असलेला पर्यावरणाचा व जैव विविधतेचा समतोल बिघडला गेला आहे.

परिणामी याठिकाणी जल, हवा प्रदूषण झाले. याच नाशिकनगरीला देवराईच्या प्रकल्पांच्या माध्यमातून पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी एक वर्षापूर्वी महापालिकेने सह्याद्री देवराईचे प्रणेते सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मदतीने शहरी देवराई प्रकल्प राबविण्याची घोषणा केली होती.

यानुसार शहरातील सहा विभागात सहा ठिकाणी नाशिक देवराई प्रकल्प राबविण्याचे जाहीर केल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थित याठिकाणी देवराई प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील देवराई प्रकल्प चांगल्या प्रकारे मुदतीत पूर्ण करण्याचा आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल व जैव विविधता टिकविण्याचा शब्द शिंदे यांना देण्यात आला होता.

याप्रसंगी काही सामाजिक संस्थांनी पुढे येत देवराईची जबाबदारी घेतली होती. मात्र एक वर्ष उलटूनदेखील शहरातील सहापैकी बहुतांशी देवराई प्रकल्पांकडे पालकत्व घेतलेल्या संस्थांनी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. सहा देवराईपैकी एक असलेल्या नवीन नाशिक भागातील कर्मयोगीनगर मधील देवराईच्या जागेवरील वृक्ष गायब असून याठिकाणी कचरा व गवत वाढले आहे.

याठिकाणी महापालिकेने पाण्याचे कनेक्शन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते पाळले नाही, परिणामी या प्रकल्पाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नगरसेवक प्रविण तिदमे यांनी यासंदर्भात अधिकार्‍यांवर काही आरोप केले आहेत.

तसेच मुबई नाका भागातील गायकवाड मळ्याजवळील मनपा शाळेजवळील देवराईचे काम पुढे सरकलेच नाही. उद्यान विभागाचे दुर्लक्ष आणि करोनाचे संकट यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अशीच काहीशी अवस्था इतर प्रकल्पांची असून महापालिका आपली जबाबदारी सामाजिक संस्थांच्या अंगावर टाकून मोकळी झाली आहे. यातून शहराच्या पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हरित सैनिकांची तत्परता

नाशिक शहरातील सातपूर विभागात फाशीचा डोंगर भागात आपलं पर्यावरण संस्थेकडून दोन वर्षांपूर्वी १२ हजार वृक्षांची लागवड करत देवराई साकारण्याचे काम झाले आहे. आता या ठिकाणी वृक्ष जगवण्यासाठी शहरातील काही हरित सैनिक दर रविवारी झाडांना पाणी घालण्याचे काम करत आहेत. याच हरित सैनिकांनी या ठिकाणच्या झाडांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत आपले वृक्षप्रेम दाखवून दिले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com