नाशिकची करोना चाचणी क्षमता हजारने वाढली
नाशिक

नाशिकची करोना चाचणी क्षमता हजारने वाढली

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून आता चाचण्या वाढण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात लॅब कार्यान्वित केल्यानंतर आता शासनाकडून मविप्र डॉ. पवार रुग्णालयातील चाचण्यांची क्षमता वाढविली आहे.

जिल्हा व मविप्र रुग्णालयात अशाप्रकारे एक हजारापर्यत चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. यामुळे आता नाशिक शहरातील चाचण्या शहरात होणार असुन याचा वेग वाढणार आहे. दरम्यान शहरात करोना विषाणू चाचणी पॉझिटीव्ह आलेली असताना रुग्णांचा अपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक न दिल्याच्या कारणावरुन बंदी घातलेल्या लॅबकडून पूर्ततासंदर्भात लेखी घेतल्यानंतर त्यांना चाचण्यास परवानगी दिली आहे.

नाशिक शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून दररोज ३५० ते ४०० नवीन रुग्ण समोर येत आहे. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या रुग्णांचा आकडा 500 च्यावर समोर येत आहे. याची शासनाकडून दखल घेण्यात आली असुन आता शहरातील करोना चाचण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे.

यात जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या लॅबची क्षमता ३०० असून आता मविप्र संस्थेच्या डॉ. पवार रुग्णालयातील लॅब क्षमता ३०० वरुन १००० पर्यत करण्यात आली आहे. अशाप्रकारे आता आता नाशिकसाठी एकूण १ हजार चाचण्याची क्षमता वाढली आहे.

यामुळे आता नाशिकचे नमुने पुण्याला न पाठविता त्यांची चाचणी नाशिक शहरातच केली जाणार आहे. यामुळे आता चाचण्याचा वेग वाढला जाणार असून कमी वेळेत चाचण्याचा अहवाल समोर येणार आहे.

परिणामी करोना संसर्ग रोकण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे. मागिल आठवड्यात नाशिक महापालिकेने काही त्रुटी व संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक न घेताच चाचण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या कारणावरुन क्रश्ना, थायरो केअर, दातार, एसआरएल व इन्फेक्स या पाच लॅबवर बंदी घातली होती.यानंतर मनपाने करोना चाचण्या पुण्याला पाठविल्या होत्या.

या बंदीमुळे चाचण्या अहवाल येण्यास विलंब होऊ लागला होता. याच दातार लॅबकडून बंदीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.या एकुणच पार्श्वभूमीवर मनपाने संबंधीत लॅबकडून त्रुटी दुरुस्त करून देण्याचे लेखी घेतल्यानंतर त्यांना चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com