Video : ... आणि आजोबांचे प्राण वाचले

लोहमार्ग पोलीस इम्रान आणि राकेश यांच्या भावना
Video : ... आणि आजोबांचे प्राण वाचले

नाशिक । प्रतिनिधी

आमची नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म दोन-तीनवर ड्युटी सुरू होती. दुपारचे पावणेबारा झाले होते. पाच मिनिटांत भुसावळ-लोकमान्य टर्मिनस गोदान एक्स्प्रेस येऊन थांबली. गाडी पाच मिनिटे थांबते. गाडीतील काही प्रवासी खाली उतरले. रियाझ अहमद शेख (67) हेदेखील पाणी पिण्यासाठी उतरले होते. गाडीने हॉर्न दिला. पण तो बहुधा सगळ्यांना ऐकू आला नसावा. गाडी सुटली आणि रियाज यांच्या लक्षात आले आणि ते गाडी पकडण्यासाठी धावले...

त्यांचा जीव वाचवणारे लोहमार्ग पोलीस इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके त्यावेळी नेमके काय घडले ते ‘देशदूत’ला सांगत होते.

तोपर्यंत गाडीने थोडासा वेग घेतला होता. आजोबा वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. तो डबा त्यांच्यासमोरून गेला आणि त्यांनी दुसराच डबा पकडायचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही.

त्यांनी एका हाताने दरवाजाचा दांडा पकडला होता. आतून एकाने त्यांचा दुसरा हात धरला होता. पण त्यांना चढता आले नाही. एका विक्रेत्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही ते शक्य झाले नाही आणि आजोबा फरफटत जाऊ लागले.

तेवढ्यात आमच्याही ते लक्षात आले. आम्ही दोघे आणि तो विक्रेताही धावलो. विक्रेता जवळ असल्याने तो आधी धावला. पण त्याला शक्य झाले नाही. आम्ही 50-60 मीटर धावलो. आम्हाला असे प्रसंग कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिलेले असते.

अचानक मला (इम्रान) आठवले की अशावेळी ज्याला वाचवायचे त्या व्यक्तीच्या कमरेला पकडायचे असते. मी शेख आजोबांच्या कमरेचा बेल्ट पकडला आणि त्यांना स्थानकावर खेचण्याचा प्रयत्न केला. पण ज्याने त्यांचा डब्यातून हात धरला होता तो काही सोडेना.

शेवटी मी त्याला जोरात सांगितले तेव्हा त्याने आजोबांचा हात सोडला. शेडमाके आणि तो विक्रेताही मदत करत होते. गाडीने थोडासा वेग पकडला असल्याने मी थोडा हेलपाटलो. पण माझ्या सहकार्‍यांनी लगेच मला आणि आजोबांना सावरले.

आम्ही त्यांना बाजूला ओढले. आजोबांचा जीव वाचला म्हणून आमचा जीव भांड्यात पडला. तुमच्या जीवाची भीती वाटली नाही का, यावर ते म्हणाले, आम्ही ते पाहिले आणि दुसरे काही सुचलेच नाही. ती वेळ विचार करण्याची नव्हती.

आम्ही आपसूकच धावत सुटलो होतो. नंतर आम्ही व लोकांनी आरडाओरड करून गाडी थांबवली आणि आम्ही आजोबांना त्यांच्या डब्यात बसवून दिले. ही घटना पहिलीच नाही. आम्ही असे अनेक प्रसंग हाताळतो.

गाडी थांबलेली असताना फार वेळ रेंगाळू नका, धावती गाडी पकडू नका. गाडी सुटण्याआधीच गाडीत बसा, असे आम्ही प्रवाशांना सांगतच असतो. अडचणीत असणार्‍यांना मदत करणे पोलिसांचे कर्तव्यच आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com