नाशिक | प्रतिनिधी

करोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा येत्या शनिवारी (दि.२६) नाशिक ते शिर्डी धावणार असून करोनाचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घालणार असल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे...

यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा,सल्लागार सुनील बुरड, जे पी जाधव, ॲड.वैभव शेटे, विशाल पाठक, संजू राठी, राजेश इसरवाल आदी असणार आहे.

गेल्या पाच वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून ते दरवर्षी विविध समाजिक उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करतात.

या अगोदर बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी ते कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घालणार आहे.

शनिवारी (दि.२६) पहाटे ५ वाजता दत्त मंदिर सातपूर नाशिक येथून त्यांनी धावायला सुरुवात करणार आहेत. त्यांनंतर सिन्नर, पांगरी सह गावागावात त्यांचे स्वागत होणार आहे.

कोण आहेत सुभाष जांगडा?

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.