शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने नाशिक शोकमग्न

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने नाशिक शोकमग्न

ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, व्याख्याते बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे नाशिकला नेहमी येत असायचे. पुण्यातून त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच नाशिकमध्येही शोक व्यक्त करण्यात आला. नाशिकमधून अनेक प्रतिक्रिया

ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, व्याख्याते बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाले. अतिशय दुःख झाले. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. आपले संपूर्ण आयुष्यभर त्यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात त्यांनी व्याख्याने दिली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ इतिहासकार महाराष्ट्राने गमावला आहे. मी माझे कुटुंबीय पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली

-छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.

बाबासाहेबांनी गायलेले पोवाडे आणि त्यांची व्याख्याने ऐकत बालपण समृद्ध झाले. या माणसांबद्दल विलक्षण आकर्षण होतं. आतून भेटण्याची तीव्र इच्छा होती पण खूप प्रतीक्षा करावी लागली. पण नंतर असा योग जुळून आला की नाशिकला जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग होणार असे समजले. ओडिशनसाठी गेलो आणि चक्क तानाजी मालुसरे, दरबान आणि एका खानाचीही भूमिका या नाटकात मला मिळाली. तालमीच्या पहिल्या दिवशी बाबासाहेब भेटले. त्यांचं बोलणं कानात साठवून ठेवलं.

बाबासाहेब वेळेचे एकदम पक्के होते त्यांनी आमची सर्वांची घड्याळे त्यांच्या घड्याळाप्रमाणे सेट करायला लावली. पंधरा दिवस तालीम झाली आणि नंतर महानाट्याचा थरार. बाबासाहेब दररोज समोर बसलेले असत. कोण चुकला, कोणी चांगले काम केले याची बारीक टिपणं काढायचे आणि त्यादिवसाचा प्रयोग संपला की सर्वांची मिटिंग घेऊन सूचना करायचे.

बाबासाहेबांचा तो थरथरता ,प्रेमळ स्पर्श आणि त्यांची सलग सात दिवस पाठीवर मिळालेली थाप आयुष्यभर लक्षात राहील. नुकतेच पुण्यात गेलो तेव्हा त्यांना भेटायला जाण्याचे ठरवले. घनश्याम दादा पाटील यांनी सांगितले की पुढच्या वेळी आपण याला तेव्हा नक्की भेटू. पण आज अचानक ही बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली

-राजेंद्र उगले (कवी)

आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या महानिर्वाणानंतर एक पर्व संपले आहे. गेल्या तीन पिढ्यांना शिवचरित्राची ओळख करून देणं आणि त्याची गोडी लावण ही काम शिवशाहीरांनी मोठ्या कुशलतेने केली. त्यांना विसरण मराठी जनतेला सर्वस्वी अशक्य आहे. त्यांच्या स्मृतीला नम्र प्रणाम.

- गिरीश टकले

निसंकोच पणे ज्यांच्या पायावर डोकं ठेवायचं ते पाय आज आपल्यातून गेले. महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहासच आज आपण गमावून बसलो. आज प्रत्येकाच्या मनात महाराजांची मूर्ती आणि हिंदवी स्वराज्याची जी अस्मिता उभी आहे.ती मुळातच बाबासाहेबांच्या ओजस्वी वाणीने साकारलेली आहे. स्वतःच्या इतिहासाबद्दल फार सजक नसलेला आपल्या समाजाला बाबासाहेब लाभले हेच आपल्या सर्वांचे पूर्वसंचित त्यामुळेच प्रत्येक मराठी मन शिवचित्रकार, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांचा कायम ऋणी राहील.

-जयप्रकाश जातेगांवकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहचवला. त्यामुळे फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात छत्रपतींच्या विचारांची एक पिढी घडली. या प्रबोधनाच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेब प्रत्येकाच्या मनामनात घर करून राहिले आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची भरून न निघणारी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..

- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक लोकसभा मतदारसंघ

बाबासाहेब पुरंदरे हे गेल्या सात दशकाहून अधिक काळ इतिहास संशोधनाचे मौलिक कार्य केले. महाराष्ट्रातील गडकिल्ले, मराठा साम्राज्य शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवज यांचा त्यांनी सखोल अभ्यास करून जनसामान्यांपर्यंत इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती नेली. त्यासाठी व्याख्याने, पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आणि त्याला वाचकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विचारवंत, नाटककार, वक्ते अशा विविध रूपांतून इतिहास लेखन आणि संशोधनाची क्षितीजे त्यांनी विस्तारली आणि इतिहासातील घटनांना अन्वयार्थ लावण्याची जनसामान्यांना दिशा दिली.

आजच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर, घडामोडींवर त्यांचे प्रभावी व अभ्यासपूर्ण भाष्य असे. एका समृद्ध व संपन्न विचारांची आयुष्यभर जोपासना करणारी थोर व्यक्तीस आपल्यातून गेली आहे. त्यांच्या कार्यााचा, कर्तुत्त्वाचा वारसा आपण जोपासणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

विश्वास जयदेव ठाकूर मार्गदर्शक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक

वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून मास्टर दिनानाथ स्मृती सोहळा के.टी. एच.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. 24 एप्रिल 1999 रोजी संपन्न झाला होता. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना साहित्य सेवेबद्दल वाड्मय विलासिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी लता दिदींच्या हस्ते व्याख्यानमालेच्या 78व्या वर्षाचा शुभारंभ करण्यात आला होता, त्यावेळी देखील बाबासाहेब उपस्थित होते.

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रपट परीक्षक कै. मनोहर पुरंदरे हे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात कार्यरत होते. ते बाबासाहेबांचे लहान बंधू होते. अशाप्रकारे बाबासाहेबांचा नाशिकशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला, नाशिक विश्वस्थ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com