नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ ही सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आहे. मात्र, मुख्यालयातील सेवक साडेपाच वाजेनंतर कार्यालयातून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

सेवक वेळेआधी घरी जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने सामान्य प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेत, सेवकांना कार्यालयीन वेळ पाळण्याचे आदेश दिले आहे. जे सेवक वेळआधी टेबलावर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

शासकीय सेवकांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. पाच दिवसांचा आठवडा करतांना कार्यालयीन वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ ही कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

परंतू, ही वेळ निश्चित असली तरी, सेवक वेळेआधीच निघून जात असल्याचे वारंवर दिसून येत आहे. साधारण सायंकाळी ५ वाजेपासूनच सेवकांची घरी जाण्यासाठी आवराआवर सुरू होते. अनेक विभागात साडेपाच वाजेनंतर टेबलांवर सेवक काम करतांना दिसत नाही. विभागप्रमुख काम करत असतात. परंतू,सेवक टेबलावर नसतात.

असे चित्र अनेकदा दिसते. अनेक विभागात सायंकाळी सेवक नसल्याने सामान्यांची कामे होत नसल्याची सदस्यांसह पदाधिकाऱ्यांची ओरड होत आहे. सेवक उपस्थित नसल्याने अनेक फाईली रखडल्या जातात. याबाबत सेवक वेळेआधी निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

या तक्रारींची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सर्व विभागाना नोटीस काढली आहे. कार्यालयीन वेळेत सेवक टेबलावर काम करतांना हजर पाहिजे.

मात्र, अनेक सेवक वेळे पूर्वीच निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सेवक टेबलावर नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे जे सेवक वेळे अगोदर निघून जातील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसा प्रस्ताव तात्काळ दाखल करावा अशा सूचना पिंगळे यांनी विभागप्रमुख यांना दिल्या आहेत.

समग्र शिक्षण विभागातील सेवकांना नोटीसा

शिक्षण विभागातंर्गत समग्र शिक्षण विभागातील सेवकांना शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी पावनेसहा वाजता कामानिमित्त बोलविले असता, विभागातील दोन सेवक वगळता सर्व सेवक निघून गेल्याचे दिसून आले.

त्यावर संतप्त झालेल्या शिक्षणाधिकारी म्हसकर यांनी कार्यालयीन प्रमुख यांना बोलावून विचारणा केली.कार्यालयीन वेळ सव्वा सहा वाजेपर्यंत असताना सेवक वेळे आधी कसे निघून गेले. याबाबत विभागात जाऊन चौकशी करा,असे सांगितले.

यात सर्व सेवक घरी निघून गेल्याचे व विभागाला कडी लावली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची म्हसकर यांनी गंभीर दखल घेत विभागातील सर्व सेवकांना नोटीसा बजाविण्याचे आदेश दिले.