नाशिक वार्तापत्र: डीजे, मद्यपार्टीमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

नाशिक वार्तापत्र: डीजे, मद्यपार्टीमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण भागात युवकांमध्ये वाढदिवसासह पुढारी होण्यासाठी चढाओढ पहावयास मिळत असून मोठ्या प्रमाणात डीजेसह (DJ) होणार्‍या मद्याच्या पार्ट्या पालकांसह जनतेची डोके दुःखी ठरत आहेत.

नाशिक तालुक्यातील (nashik taluka) ग्रामीण भागात (rural area) गावोगावी युवावर्गाचे वाढदिवसाच्या निमित्ताने लागणारे बॅनर्स (banners) व सायंकाळी त्याच ठिकाणी कापण्यात येणारे केक, वाजविला जाणार डीजे व त्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरूणाई हे सर्व भावी काळासाठी घातक ठरू शकतात. हे सर्व माहीत असूनही या युवकांना कोण समजविणार असा प्रश्न गावाच्या पारावर बसलेल्या जेष्ठ मंडळीना पडत आहे.

काही वर्षा पूर्वी मातोरी येथील फार्महाऊसवर डीजे (DJ) चालकांला झालेली मारहाण (beating) तसेच दाखविण्यात आलेला बंदुकीचा धाक ही घटना सर्ववत असतानाच त्यांचीच पुनरावृत्ती सध्या ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांवर दिसून येत आहे. खेडेगावात सध्या तरुण वाढदिवसाच्या निमित्ताने डीजे लाऊन, दारु, गांजा व इतर व्यसन करून रात्रभर आवाज मोठा करून धिगांणा घातला जात आहे. कोणी काही बोलले तर धमकावणे, मारहाण (beating) करण्याच्या घटना घडत असतात. याबाबत ग्रामीण पोलिस यंत्रणा अधिक सतर्क असणे गरजेचे आहे.

शिवाय पुढारी बनण्यासाठी सध्या युवकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. पूर्वी सामाजिक कार्यातून गावागावाचे लोकप्रतिनिधी पुढे येत असत. मात्र आता सर्व क्षेत्रात ट्वेंटी-ट्वेंटीचा जमाना सुरू झाला आहे. बॅनरबाजी करणे, पांढरे कपडे घालणे अशी पुढारपणाची लक्षणे आता दिसू लागली आहेत. त्यातूनच गटबाजी व अमाप खर्चाची उधळण या बाबी पुढे येत आहेत.

सुशिक्षित तरुण निवडणुकीत सहभागी होऊन नशीब अजमावून लागला आहे. अशा सुशिक्षित तरुणांमुळे गावाच्या विकासाला निश्चितच वेगळी दिशा मिळू शकते. परंतु विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पुढारपण करणार्‍या मंडळीची संख्या सध्या जास्त आहे. त्यातच गावात नोकरीची संधी कमी व शेतीमालाला भाव नसल्याने नैराश्य आलेले तरुण सर्वात सोपा मार्ग म्हणून राजकारणाला जवळ करतात.

कोणाचातरी कार्यकर्ता होऊन जयजयकार करताना आपली नेमकी दिशा काय राहणार आहे, यांचे भान विसरुन जातात. यातुनच मग हे युवक नको त्या मार्गाला लागून आपला भविष्यकाळ अंधारमय करतात, याचे अनेक उदाहरणे गावोगावी बघावयास मिळतात. युवकांचे भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेऊन सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवसभर रानावनात काबाडकष्ट करून घरी आलेला बळीराजा व त्याचे कुटुंब रात्री शांत झोप देखील घेऊ शकत नाही. कारण झोपण्याच्या वेळेत गावच्या वेशीवर अथवा गल्लीत डीचेचा धिगांणा सुरु होतो व रात्र भर झोप न लागल्याने दुसरा दिवस डोकेदुखी, चक्कर येणे यासह इतर आजार उदभवतात. त्यातूनच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व अनेक आजाराचे संकट ओढवून घेतले जाते.

काळ मोठा कठीण असतांना युवावर्गाने आता बदलले पाहिजे. स्वतःसह सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ‘माझा गाव माझे कुटुंब’ ही संकल्पना राबविली पाहिजे. त्यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी देखील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com