नाशिक स्मार्ट सिटी ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’मध्ये

नाशिक स्मार्ट सिटी ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’मध्ये
India Cycles 4 change challenge

नाशिक । Nashik प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या शहरांत सायकलिंगचा उपक्रम केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण शहरी कामकाज मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमात नाशिक शहर सहभागी होत असून या उपक्रमात नाशिकला अव्वल आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था व नाशिककरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

मार्च महिन्यात देशभरात करोना विषाणू साथीने लागू झालेल्या लॉकडाऊनकाळात सर्वत्र शहराला वाहतूक व दळणवळणासंदर्भात इतर पर्यायी व्यवस्थेकडे वळणे भाग पाडले आहे. याकाळात 50 ते 65 टक्के सायकलचा वापर वाढल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेेशन अ‍ॅण्ड डेव्हपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) यांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यानुसार देशभरातील शहरांत सायकलिंग हा उपक्रम राबवण्याचा विचार करण्यात आला आहे.

पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. नाशिक शहरही नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून यात सहभागी होत आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सायकल चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यसाठी नागरिकांची साथही आवश्यक असल्याने जास्तीत जास्त स्वयंसेवी व नागरिकांनी यात सहभागी होऊन नाशिक शहराला या चॅलेंजमध्ये अव्वल आणण्यासाठी https://smartent.niua.org/indiacyclechallenge/content/supprt-your-city या लिंकवर जाऊन क्लिक टू गेट इनव्हल्ड येथे टॅब करून आपला प्रतिसाद नोंदवा आणि चॅलेंजमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन नाशिक स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येत आहे. इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजचा भाग बना अणि नाशिक शहराला देशातील सायकल पंढरी अशी ओळख मिळवून द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच या चॅलेंजच्या दुसर्‍या टप्प्यात ज्या शहराची निवड होईल त्या शहरांना इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमाअंतर्गत शहरात सायकलिंगच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी एक कोटी रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या दुसर्‍या टप्प्यात द इंडिया सायकल्स फॉर चेंज फेस्टिव्हल ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू होणार असून तो मार्च 2021 पर्यंत असणार आहे. तेव्हा या उपक्रमात नाशिककरांनी व सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवड झालेल्या शहरांत हे करावे लागेल

कमी खर्चात पॉप अप म्हणजे तात्पुरते सायकल ट्रॅक उभारणे. त्याद्वारे सायकल ट्रॅकचे जाळे उभे करण्यास मदत होईल.

वाहनरहीत मार्ग बनवणे म्हणजे एखाद्या मार्गावर वाहनांना नो एन्ट्री ठेवावी लागणार, फक्त सायकल वापरास परवानगी असेल.

पायलट सायकल ट्रॅक निर्माण करणे. उदा. स्मार्ट रोडवर बनवण्यात आलेला सायकल ट्रॅक.

समुदायाच्या नेतृत्वात सायकल जनजागृती व सायकल भाडे योजना राबवणे. यासाठी एनजीओची मदत घेणे.

विविध इव्हेंटस्, विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत ही चळवळ पोहोचवणे आणि त्यांना सायकलिंगसाठी उद्युक्त करणे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com