Nashik Sinner News: दोन दिवसात तीन बिबटे जेरबंद

Nashik Sinner News: दोन दिवसात तीन बिबटे जेरबंद

सिन्नर | प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात उच्छाद मांडलेल्या बिबट्यांपैकी आणखी एक बिबट्या सलग दुसऱ्या दिवशी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील नांदुरशिंगोटे व दोडी बुद्रुक शिवाराच्या हरहद्दीवरही बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.

गेल्या महिनाभरापासून नायगाव शिवारात चार बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडलेला होता. जवळपास नऊ हल्ल्यांमध्ये १२ नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर वनविभागाने रात्रीच्यावेळी नाईट डिव्हिजन कॅमेर्‍यांचा वापर करुन बिबट्या सर्च ऑपरेशन राबवले.

Nashik Sinner News: दोन दिवसात तीन बिबटे जेरबंद
Nashik Crime News : दरोडा व शस्त्रविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीररित्या कोयता व चाकू बाळगणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

त्यात बिबट्याच्या हालचालीही टिपण्यात आल्या व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. सोमवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास नायगाव उपबाजार आवाराजवळील त्र्यंबक भांगरे यांच्या वस्तीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला तर मंगळवारी (दि.१०) याच परिसरातील दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अडकल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांनी दिली.

दोन्ही बिबट्यांचे वय अंदाजे अडीच वर्षांच्या आसपास आहे. पुन्हा पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक पंढरे, वनरक्षक संजय गीते यांच्यासह झेप सामाजिक विचारमंचे सदस्य गोविंद कदम, रोशन गायकवाड, सौरभ बैरागी, मंगेश खालकर, जुबेर अत्तार, संदिप चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर वनसेवकांनी पिंजरा मोहदरी येथील वन उद्यानात हलवला आहे.

Nashik Sinner News: दोन दिवसात तीन बिबटे जेरबंद
Nashik News : सुषमा अंधारेंच्या प्रतिमेला शिंदेंच्या शिवसेनेकडून 'जोडे मारो'; दिला 'हा' इशारा, पाहा Video

नायगावसह नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक शिवाराच्या सरहद्दीवर असलेल्या शेळके वस्तीवरही वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद झाल्याचे समोर आले. गेल्या पंधरा दिवसापासून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शेळके वस्तीजवळ बिबट्याचा मुक्तसंचार वाढला होता. गत आठवड्यात बिबट्याने चार शेळ्या व पाच कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती.

वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे व वनरक्षक चंद्रमणी तांबे, वनमजूर संतोष मेंगाळ, जगन्नाथ जाधव, सखाराम भले यांनी शेळके वस्ती परिसरात पाहणी करुन शेळके यांच्या शेतात दोन दिवसापूर्वी पिंजरा लावला होता. मध्यरात्रीचा सुमारास बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे कळताच वनसेवकांनी घटनास्थळी जात पिंजऱ्याला तेथून हलवले आहे.

Nashik Sinner News: दोन दिवसात तीन बिबटे जेरबंद
Nashik Dindori News : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या उक्तीला दिंडाेरी पाेलिसांकडून हरताळ; तीन महिन्यात चार पाेलिसांवर निलंबित हाेण्याची वेळ

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दहशत

तालुक्यातील अनेक भागात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नायगाव, भोजापूर खोरे, खंबाळे, वडागंळी आदी भागात बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल व डोंगराळ भाग आहे. दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी शेळके वस्ती, दराडेवस्ती, सांगळेवस्ती, बर्के वस्ती आहे. डोंगराळ परिसर असल्याने या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. बिबट्या पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत असतात. रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर शेतकरी घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत. अशात दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com