हाैसेला माेल नाही...;आकर्षक वाहन क्रमांकांतून आरटीओला मिळाला 'इतका' महसूल

हाैसेला माेल नाही...;आकर्षक वाहन क्रमांकांतून आरटीओला मिळाला 'इतका' महसूल

नाशिक : प्रतिनिधी

कराेनामुळे व्‍यवसाय, उद्योगांवर परिणाम झाला, तर नोकरदारांना पगार कपात किंवा बेरोजगारीपर्यंतच्‍या संकटाचा सामना करावा लागला. अशा आर्थिक संकटाच्‍या काळातही आकर्षक आणि व्‍हीआयपी वाहन क्रमांकाची मागणी कायम राहिली आहे. नाशिक आरटीआेला एप्रिल २०२० ते मार्च २०१२ या कालावधीत आकर्षक क्रमांकातून तब्‍बल तीन कोटी ९९ लाख पाच हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

शुभ आणि आकर्षक आकडा वाहनाच्या क्रमांकात असावा, अशी अनेकांची इच्छा असते. अशा काही आकर्षक क्रमांकांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुल्‍क निर्धारित केले आहे. त्यानुसार ज्या वाहनधारकांना आवडीचे व आकर्षक तसेच शुभअंक वाहनाच्या क्रमांकात पाहिजे असतात, त्यांनी लाखाे रुपये भरुन हे वाहन क्रमांक मिळवले आहेत.

गेल्‍या वर्षी लॉकडाऊनमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे शाेरुम बंद होते. मात्र, अनलॉकनंतर पुन्‍हा जनजीवन सुरळीत होताच, ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बहर आला होता.

विशेषतः चारचाकी वाहनांच्‍या मागणीत वाढ झाली होती. वाहनाला आकर्षक किंवा मर्जीचाच क्रमांकच हवा, असा अनेकांचा आग्रह असल्‍याने व्‍हीआयपी क्रमांक योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गत आर्थिक वर्षात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास तब्‍बल तीन कोटी ९९ लाख पाच हजारांचा महसूल व्‍हीआयपी क्रमांकाच्‍या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

पसंतीचा क्रमांक निवडताना वर्षभरात चार हजार ७७० वाहनधारकांनी योजनेत सहभाग नोंदविला. विभागाकडून निर्धारित शुल्‍क अदा करत या वाहनधारकांनी पसंतीच्या क्रमांकाची निवड वाहनासाठी केली.

यात सर्वाधिक ७९४ वाहनधारकांनी या वर्षी मार्चमध्ये आकर्षक क्रमांक योजनेचा लाभ घेतला. गेल्‍या वर्षी एप्रिलमध्ये अवघे चार, मेमध्ये २४, जूनमध्ये २१०, जुलैत १३५, ऑगस्‍टमध्ये २०७ जणांनी आकर्षक क्रमांकाची निवड केली.

यानंतर सण- उत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीत वाढ होताना आकर्षक क्रमांक निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये ३३५, ऑक्‍टोबरमध्ये ६२९, नोव्‍हेंबरमध्ये ६२९, डिसेंबरमध्ये ६३९, जानेवारीत ५१७, फेब्रुवारीत ६४१ वाहनांसाठी व्‍हीआयपी क्रमांकाची निवड केली.

व्‍हीआयपी क्रमांक योजनेंतर्गत एप्रिल २०२० मध्ये ८४ हजार रुपये, मेमध्ये एक लाख ९५ हजार, जूनमध्ये १६ लाख १२ हजार, जुलैत ११ लाख ९२ हजार, ऑगस्‍टमध्ये १५ लाख २८ हजार, सप्‍टेंबरमध्ये २९ लाख ७५ हजार, ऑक्‍टोबरमध्ये ५३ लाख पाच हजार, दिवाळीत नोव्‍हेंबरमध्ये ६१ लाख दोन हजार रुपये महसूल मिळाला. डिसेंबरमध्ये ५१ लाख ९७ हजार, जानेवारीत ४१ लाख ५२ हजार, फेब्रुवारीत ५१ लाख ९७ हजार, तर आर्थिक वर्षाच्‍या शेवटा महिना मार्चमध्ये ६४ लाख पाच हजार रुपये महसूल व्‍हीआयपी क्रमांकातून नाशिक आरटीओ कार्यालयाला मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com