करोना रुग्णांना दीपस्तंभचा आधार!

करोना रुग्णांना दीपस्तंभचा आधार!
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक । प्रतिनिधी

करोना झालेले किंवा बरे झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय भावनिक दृष्टीने अस्वस्थ असतात. त्यांना खूप शंका असतात. त्यांचा ताण कमी व्हावा, त्यांचे जगणे आनंददायी व्हावे, यासाठी ‘दीपस्तंभ’ उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम डॉ. राजेंद्र खैरे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री गुरुजी रुग्णालयाच्या सहकार्याने राबवला जातो, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक मिलिंद जोशी यांनी दिली...

Q

‘दीपस्तंभ कोविड मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र’ हा काय उपक्रम आहे?

A

अनेकांना करोनाचा संसर्ग होतो. बरे झाल्यानंतर गृह विलगीकरणात राहावे लागते. हा काळ खायला उठतो अशीच सामान्यतः बहुतेक रुग्णांची प्रतिक्रिया असते. आजाराची, परिवाराची चिंता सतावते. बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीचाही विपरित परिणाम होतो. नोकरीची, व्यवसायाची, आर्थिक अस्थिरतेची चिंता सतावते. अशा वेळी ‘दीपस्तंभ’चे कार्यकर्ते त्यांच्याशी गप्पा मारतात. रुग्ण त्यांचे मन मोकळे करतात. त्यांचा हा कठीण काळ आनंददायी व्हावा, त्यांचे मन मोकळे व्हावे, असा प्रयत्न आहे.

Q

उपक्रम का सुरू करावासा वाटला?

A

रुग्णालयांवर कामाचा, वाढत्या करोना रुग्णसंख्येचा ताण आहे. समाजात करोनाची दहशत आहे. लोक जेव्हा तपासणी करून घ्यायला येतात तेव्हाही त्यांना खूप प्रश्न विचारायचे असतात. करोनातून बरे झाल्यावर रुग्णांना आयसोलेट व्हावे लागते. त्या काळातही त्यांना अनेक प्रश्न पडतात. अनेकदा रुग्ण वेगवेगळे असले तरी प्रश्नांचे स्वरूप बहुतेकदा सारखेच असते. प्रत्येक रुग्णाच्या सर्व शंकांचे निरसन करण्याची डॉक्टरांना इच्छा असली तरी ते शक्य नसते. ती उणीव ‘दीपस्तंभ’चे कार्यकर्ते भरून काढतात. डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. या केंद्राच्या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णांच्या शंकांचे निरसन केले जाते.

Q

हा उपक्रम कधी सुरू झाला?

A

करोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरू झाला. फक्त तेव्हा याचे केंद्र भोसला मिलिटरी कॉलेजच्या आवारात होते. कार्यकर्ते तिथे बसून काम करायचे. पण आता करोनाची तीव्रता आणि निर्बंधही वाढले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आपापल्या घरी बसून काम करतात.

Q

या उपक्रमात किती कार्यकर्ते सहभागी आहेत? ते कसे काम करतात?

A

सध्या कार्यकर्त्यांच्या 25 टीम केल्या आहेत. एकूण दीडशेच्या आसपास कार्यकर्ते यात सहभागी आहेत. सगळे कार्यकर्ते स्वेच्छेने मोफत सेवा देत आहेत. रोज त्यांना 25 रुग्णांची यादी दिली जाते. हा सगळा डेटा आपल्याला महानगरपालिकेकडून मिळतो. कार्यकर्ते दिवसभरात त्या 25 रुग्णांना कॉल करतात. त्यांची माहिती घेतात. ते कुठे आहेत? कोविड सेंटरमध्ये, रुग्णालयात किंवा विलगीकरणात आहेत का हे विचारतात. त्यांना काही अडचणी आहेत का ते समजावून घेतात. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करतात. दीपस्तंभ हेल्पलाइनचे मोफत समुपदेशनाचे 9422749989 व 9422759673 हे दोन फोन नंबर जाहीर केले आहेत. या क्रमांकावरही रुग्ण फोन करू शकतात. बेड, प्राणवायू, प्लाझ्मा, टिफिन, समुपदेशन, डॉक्टरांचा सल्ला असे विविध आठ विषय आपण निश्चित केले आहेत. या विषयांवरील शंकांची उत्तरे कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

Q

करोनाच्या पहिल्या लाटेपासून तुम्ही या उपक्रमात सहभागी आहेत? दोन्ही वेळच्या परिस्थितीत काही फरक आहे?

A

निश्चितच आहे. आता घरोघरी रुग्ण आढळतात. तरुणांमध्ये संसर्ग वाढत आहे. निर्बंधांची लोकांना सवय झाली आहे. जागरूकता वाढत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी खूप लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती होती. आता भीतीचे कारण बदलले आहे. आता करोना झाला तर मी जगेल का? हाच प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. मला संसर्ग होईल का? झाला तर लगेच रुग्णालयात दाखल व्हावेच लागेल. मग खाट मिळेल का? इंजेक्शन आणि प्राणवायू उपलब्ध होईल का? अशीही दहशत पसरली आहे. त्या दृष्टीने समुपदेशन केले जाते.

Q

रुग्णांचा प्रतिसाद कसा आहे?

A

अत्यंत समाधानकारक! आपली कोणीतरी दखल घेते ही भावनाच त्यांच्यात उत्साह निर्माण करते. हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com