नाशिक | Nashik

करोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विशेष अशा 'ब्रेक दि चेन' मोहिमेला सुरुवात केली आहे.

नाशिकरांकडून आता मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी काही ठिकाणी गर्दी दिसली मात्र दुपारनंतर चित्र पालटले होते तर आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ सुनेसुने झाल्याचे दिसून येत आहे.

करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशा वातावरणात त्याची साखळी तोडणे महत्त्वाचे असल्यामुळे नाशिकमध्ये दर शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आदेश होते, हा पॅटर्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लागू केला आहे.

तर 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉक डाऊनची घोषणा करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होतांना आज सकाळपासून दिसत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड, भद्रकाली मार्केट, कानडे मारूती लेन, धान्य बाजार, दूध बाजार, फाळके रोड, गंजमाळ, शालिमार आदी भागातील बहुतेक दुकाने बंद आहेत तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नाशिकच्या सुजाण नागरिकांनी यांनी समाधान व्यक्त केले आहेत.