
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
14 एप्रिल रोजी साजरा होणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती उत्सव निमित्त नाशिक सज्ज झाले असून, जयंतीची जय्यत तयारी जुने नाशिक परिसरात सुरु आहे.
मागील दोन आठवड्यांपासून भीमसैनिक जयंतीची तयारी करीत असून आता अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू आहे. जयंतीच्या (Jayanti) पार्श्वभूमीवर जुने नाशिकच्या मोठा राजवाडा या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी भीमसैनिकांनी केली आहे. जुने नाशिक (Old Nashik) परिसरातील विविध चौकांमध्ये लहान मोठ्या स्वरूपाचे अभिवादन स्टेज तयार करण्यात येऊन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
संविधान (Constitution) निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिलच्या रात्री बारा वाजता ठिकठिकाणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, अभिवादन करून जल्लोष होणार आहे; तर 14 एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.