Panchavati | प्रतिनिधी Panchvati
६० वर्षाची परंपरा असलेला पंचवटी व नाशिकला जोडणारा हा पादचारी पूल तोडू नये तोडल्यास तीव्र विरोध राहील. तसेच या पुलावरून काही अशांतता निर्माण झाल्यास स्मार्ट सिटी व संबंधित अधिकारी यास जबाबदार असतील असे रामसेतू बचाव अभियानाच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी सांगितले...
त्या आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गोदावरी नदीवरील रामसेतू पुलाची ओळख जुनी आहे. पूर्वी पंचवटीतून नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या कामांसाठी पादचारी मार्ग म्हणून रामसेतू पूल हा एकमेव होता.
अनेक पूर या रामसेतूने झेलले आहेत. तरीसुद्धा तो आज ताठ मानेने उभा आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकच्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. नारोशंकराच्या जवळील दोन सांडवे स्थानिक नागरिकांना विचारात न घेता तोडले गेले.
आता पादचाऱ्यांसाठी रामसेतू पूल हा एकमेव पर्याय असताना त्याला पाडण्याचा घाट घातला जात आहे. स्मार्ट सिटीचा पैसा खर्च करायचा असेल तर रामसेतू पुलाची डागडुजी करा, पूल सुशोभित करा परंतु तोडण्याची भाषा करू नका.
त्या पुलावर नवीन स्लॅप टाकण्याची गरज आहे. पुलाचे पिलर मजबूत आहेत. गोदाघाट रामसेतू पूल व राम घाटावरील मंदिरे हे आधीपासून आहेत. तेव्हा त्यांना न पाडता दुरुस्ती करून सुशोभीकरण करावेत.
स्मार्ट सिटीच्या कामाला आमचा विरोध नाही, परंतु गंगाघाटचे पावित्र्य व ऐतिहासिक वास्तूंच्या खुणा जपून त्यांनी सुशोभीकरण करावे अन्यथा स्मार्ट सिटीच्या रामसेतू पुलाला तोडण्याचा कामाला आमचा विरोध राहील.
केवळ ठेकेदारांना पैसे मिळावेत म्हणून त्यांनी काम करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत सुनील महंकाळे यांनी राम सेतू पुलाची उपयुक्तता सांगितली.
शहरासाठी सोईयुक्त बांधकाम व सुशोभीकरण करणे हा स्मार्ट सिटीचा उद्देश आहे. रामसेतू पूल पाडणे हा उद्देश नाही. पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पत्रव्यवहार केलेला आहे. आठ दिवसात त्याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर रामसेतू पुलाची दुरुस्ती करायची की पाडायचा हा निर्णय समिती घेईल.
सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी नाशिक