हायस्पीड रेल्वेमुळे नाशिकसह पुणे, अ.नगरच्या विकासाला गती

पालकमंत्री भुजबळ : भुसंपादन आढावा
हायस्पीड रेल्वेमुळे नाशिकसह पुणे, अ.नगरच्या विकासाला गती

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून या द्रृतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले....

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.३१) नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादना बाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्यवस्थपकीय संचालक सचिन कुलकर्णी, उपजिलहाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा देशातील पहिलाच सेमी हास्पीड मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून २३५ कि. मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाईनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ असणार आहे.

या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.

भुसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून प्रतितास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे.

पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतूकीशी जोडला जाणार आहे.

नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मर्गावर प्रवाशी वाहतूकीला गती येणार आहे. तसेच या द्रृतगती मार्गावर असणारे सर्व स्थानके सर्व सोयीयुक्त असावे, असे भुजबळ यांनी संबंधित विभागाला सुचित केले.

कृषी केंद्र रेल्वे मार्गामुळे जोडली जाणार

नाशिक- पुणे - अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे. प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तीन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे.

या प्रकल्पामुळे तिन्ही जिल्ह्याचा विकास होणार असून, कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी समृध्दी महामार्गाच्या धरर्तीवर थेट वाटाघाटीतून जमीन संपादन केली जाणार आहे.

या तिन्ही जिल्ह्यातून १०१ गावांमध्ये १३०० हेक्टर भुसंपादन केले जाणार अाहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादीत केली जाणार आहे अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य मोबदला देण्यात येईल असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com