नाशिक । Nashik

जिल्ह्यात वाढत्या करोना रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

मास्कचा वापर न करणे, संचारबंदी नियमांकडे दुर्लक्ष, विवाहसोहळ्यांसाठी होणारी गर्दी आणि बाजारपेठेतील गर्दी नियंत्रण आणण्यासाठी महापालिका कर्मचार्यांबरोबरच आता पोलिसही रस्त्यावर उतरून कारवाई सुरू करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यासह राज्यात करोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे, नाशिक शहरासह जिल्ह्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क झाले आहेत.

सध्या संचारबंदी नियमांचे पालन करण्याकडे पोलिस लक्ष देणार आहेत. शहरात आयोजीत होणारे विवाह समारंभ करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. शंभर जणांच्या उपस्थितीस परवानगी असताना विवाह सोहळ्यांना मोठी गर्दी होते. त्यामुळे या विवाहांना लक्ष करण्याच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. विवाहादरम्यान गर्दीचा नियम मोडल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असून, थेट गुन्हे दाखल होणार आहेत.

मास्क न वापरणार्यांविरोधात महापालिका प्रशासन काही दिवसांपासून कारवाई करते आहे. मात्र महापालिका प्रशासनासमवेत पोलिस सुद्धा कारवाईसाठी पुढे येणार आहेत. मास्कचा वापर न करणार्यांविरोधात एक हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील. बाजारपेठेतील गर्दी हा चिंतेचा विषय असून, ती रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येतील, यावर पोलिस प्रशासनाचा खल सुरू झाला आहे.

ग्रामीण पोलिस दलाने कारवाई आणि जनजागृतीची सुरूवात यापूर्वीच केली आहे. सोशल डिस्टेन्सींग, मास्कचा वापर न करणे, गर्दी नियंत्रण आदी बाबी सुरू आहेत. त्यातच ग्रामीण पोलिसांनी विवाह कार्यालयांना सुद्धा भेटी देण्यास सुरूवात केली आहे.

विवाह सोहळ्यास नियमानुसारच उपस्थिती असावी आणि अक्षदांसमवेत उपस्थितीतांना मास्कचे वितरण करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.