पोलीस रस्त्यावर; ३६३ जणांना दंड

कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाईचा धडाका
पोलीस रस्त्यावर; ३६३ जणांना दंड

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

करोनाचे नियम नागरीक डावलत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. यामुळे सर्व नियमावलीचे कठोर पालन होण्यासाठी शहर पोलिसही आता रस्त्यावर उतरले असून आता नागरिकांना आवाहनाऐवजी कारवाईचा दणका सुरू केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमीकेमुळे नियम मोडणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शहर पोलीस आयुक्तालयातील आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, १३ पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी आता रस्त्यावर उतरलेआहेत. रविवारी (दि.२८) रात्रीपासून पोलिसांनी शहरभर कठोर कारवाई सुरु केली असून रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कारवाईत ३६३ बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नाशिककरांना २ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अल्टीमेटम देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलिस प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत कठोर कारवाईबाबत निर्णय झाला आहे. दंडात्मक कारवाई, दंडुका, दुकाने सील करणे, सोशल डिस्टेन्सींग नियमांचे पालन आदीबाबी पोलिसांनी गांर्भियाने घेण्यास सुरूवात केली आहे.

रविवारी सायकांळनंतरच पोलिसांनी रस्त्यावर उतरण्यास सुरूवात केली. पोलिस वाहनांवरील पब्लीक ऍड्रेस सिस्टिमचा वापर करीत नागरिकांना रविवारी रात्रीपासून लागू होणार्‍या नियमांची जाणिव करून देण्यात आली.

करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मेडिकल सोडून इतर सर्व आस्थापना रात्री आठपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत जमावबंदी आहे.

मात्र या नियमांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार शहरात नियमांचे पालन न करणार्‍या आस्थापना चालकांसह नागरिकांवर कारवाई केली जात आहे. ग्राहकांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी दुकानांसमोर योग्य अंतरावर वर्तुळ किंवा चौकोन आखण्याचे आदेश दिले असून त्याचे पालन होत आहे की नाही याची पाहणी पोलीस करीत आहेत.

ज्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करण्यास कुचराई केल्याचे दिसून आले अशा दहा अस्थापनाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या आस्थापनाचालकांना ३६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

सामाजिक अंतराचे उल्लंघन करणार्‍या चार नागरीकांवर कारवाई करत चार हजारांचा दंड करण्यात आला. तसेच विनामास्क फिरणार्‍या ३६३ नागरिकांना ९१ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलीस ठाणे निहाय मास्क कारवाई (कंसात आस्थापनारील कारवाई)

आडगाव-३९, म्हसरुळ-३६, पंचवटी-०७, भद्रकाली-५५, मुंबईनाका-५७ (१), सरकारवाडा-४६ (१),गंगापुर-४५ (३), सातपुर-०५, अंबड-४१ (२), इंदिरानगर-१६, नाशिकरोड-०६ (३), देवळाली कॅम्प-१०

अस्थापनांनाही समज

अस्थापनांच्या वेळा, होम क्वारनंटाईन नियमांचे पालन न करणारे रूग्ण, पोलिसांच्या कामात नागरिकांचा सहभाग आणि व्हिजीबल पोलिसींग अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. समाजिक अंतराचे सर्वाधिक उल्लंघन अस्थापने, हॉटेल्स, बारमध्ये होते. याबाबत वेळोवेळी नियमांची जनजागृती करण्यात आली आहे. यापुढे ५० टक्के ग्राहक उपस्थितीचा नियम आणि नव्या नियमानुसार दुकाने सात वाजेपर्यंत बंद झाली नाही तर, अशी अस्थापने थेट सील करण्यात येणार आाहेत. खाजगी अस्थापनांच्या वेळात बदल करण्यात आला असून, मेडिकल वगळता सर्व दुकानांना वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असणार आहे.

अमोल तांबे, पोलीस उपायुक्त

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com