आज मी केले तर उद्या माझ्यासाठी कोणीतरी करेल !

पोलीस सेवक करोना रूग्णांना पुरवतोय ऑक्सीजन
आज मी केले तर उद्या माझ्यासाठी कोणीतरी करेल !
USER

नाशिक | Nashik

माझ्या कुटुंबात कोणीही करोना रूग्ण नाही. परंतु माझ्या मित्राची अडचण होती.

त्याची पत्नी कोवीड पॉझिटिव्ह आली. रूग्णालयातील उपचारांनंतर त्यांना घरीही ऑक्सीजनची गरज होती. हरतर्‍हेने प्रयत्न करूनही ऑक्सीजन सिलेंडर मिळेना. त्यावेळीच माझ्या कामाची दिशा मला सापडली.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नझीम शेख यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले आहे. गरजू रुग्णांना ते मोफत वापरायला देतात. या कामाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ते त्यांनी 'देशदूत'ला सांगितले.

आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर मिळेना. युट्युब वर ऑक्सीजन निर्माण करणार्‍या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची माहिती मिळाली. शहरात हे मशीन उपलब्ध असल्याचे समजले. त्याची किंमत ५० हजार सांगण्यात आली. माझ्याकडे पैसे नव्हते. एका मित्राला ३० हजारापर्यंत मोबाईल घ्यायचा होता. मी त्याला माझ्या क्रेडिट वर हप्त्याने मोबाईल घेऊन दिला. त्याचे हप्ते मी भरणार आहे. ते ३० हजार आणि माझ्या बचतीचे १० हजार असे ४० हजार जमवले.

माझ्या वरिष्ठांना याबाबत सांगीतल्यानंतर त्यांनी दुकानदारास हे सामजिक काम असल्याचे सांगत त्यांनी मशिनची किंमत अखेर ४० हजार केली. मशीन विकत घेऊन तडक मित्राचे घर गाठले.

हे मशीन पाण्यातून ऑक्सीजन तयार करते. ४०० मिली. पाण्यातून ५ किलो ऑक्सीजन मिळतो. एका रूग्णास तो २ तास पुरतो. पुन्हा पाणी टाकून ऑक्सीजन तयार होत राहतो.

मित्राची पत्नी बरी झाली. मग ते इतर रुग्णांसाठी वापरायला सुरुवात केली. दुसर्‍या एका रूग्णास ऑक्सीजन बेड मिळेपर्यंत तातडीने ऑक्सीजनची गरज होती. ते मला समजले तेव्हा मशीन त्याला दिले. आतापर्यंत १२ रूग्णांना या मशीनद्वारे ऑक्सीजन देऊन त्यांचे जीव वाचवण्यात यश आले.

आमची धावपळीची ड्युटी असते. पण तरी मदतीसाठी कॉल आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरिक्षक शेख हे मला तात्काळ कामातून काही वेळासाठी मोकळे करतात. तेवढ्या वेळात मी रुग्णांना मशीन नेऊन देतो. कधी कधी रूग्णाचे नातेवाईक स्वतः मशीन नेतात. त्यांना वापराबाबत मी मार्गदर्शन करतो.

या सर्वातून समाधान मिळते. रूग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे आशिर्वाद उर्मी देतात. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. याकाळात मिळणारे पुण्य मला जन्मोजन्मी पुरेल. मी इतरांसाठी काही केले तर उद्या माझ्यासाठी इतर लोक पुढे येतील ही

सामाजिक जाणीव कायम जागी असते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com