हवा प्रदूषणात नाशिक धोक्याच्या उंबरठ्यावर

जागतिक रँकिंगमध्ये 244 वा क्रमांक
हवा प्रदूषणात नाशिक धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिक । रविंद्र केडिया

नाशिकचे वातावरण जरी सुदृढ वाटत असले तरी प्रत्यक्षात नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. नाशिक प्रदूषणातील धोकादायक शहरांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 2019 या वर्षाअखेर काढलेल्या सरासरी आकडेवारीत नाशिक हे संवेदनशील गटात मोडले गेले.

नुकत्याच झालेल्या जागतिक स्तरावरील सर्वेक्षणात नाशिक हे जगभरातील शहरांपैकी 244 व्या स्थानावर तसेच भारतातील सर्व शहरांपैकी 67 व्या स्थानावर आहे. तातडीने उपाययोजना केल्यास आपण सुरक्षित शहरांमध्ये वर्ग होऊ शकतो, शासनस्तरावरून उपाययोजना केल्या जात आहेत, नागरिकांनीही त्यात सहभाग घेणे अपेक्षित आहे.

नाशिकच्या पर्यावरणाच्या गुणवत्तेची घसरण ही येथील हवेची गुणवत्ता घसरल्याने झालेली आहे. मागील वर्षी सरासरीत 39.3 आहे. या रिडिंगमुळे नाशिक संवेदनशील गटांत येत आहे. नाशिकमध्ये हवेची इष्टतम दर्जापेक्षा काही कमी प्रमाणात गुणवत्ता आढळली आहे.

राज्यातील सर्वात वेगाने विकसित होणारे चौथे शहर असतानाही जागतिक रँकिंग दर्शविते की नाशिकला हवेच्या प्रदूषणाची पातळी सुधारण्यासाठी अजून बर्‍याच उपाय योजना कराव्यात लागणार असून काही महिने धोकादायक पातळी अशीच राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रदूषण मंडळाद्वारे उपाय योजना

याच पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षापासून हवेची गुणवत्ता सुधरवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने क्लीन एअर प्रोजेक्ट इंडिया (सीएपी इंडिया) ला स्विस एजन्सीने विकास आणि सहकार्य करण्यासाठी (एसडीसी) सहमती दर्शवली आहे. या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट नाशिक शहरासह इतर तीन शहरांमधील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे हे आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (एनईईआरआय), ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया(एआरएआय)सारख्या बर्‍याच स्थानिक संस्थांसह टाटा ऊर्जा अनुसंधान संस्थान (टेरी) या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह हवेतील गुणवत्ता व्यवस्थापन योजनेत सुधारणा करण्यासाठी टाटा ऊर्जा अनुसंधान संस्थान अर्थात टेरी ही संस्था नाशिक शहरात कार्यरत आहेत. प्रदूषण नियंत्रणात शहरातील भिन्न भिन्न स्त्रोत काय भूमिका बजावतात हे समजून घेण्यासाठी, टेरीच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून अभ्यास करण्यात येत आहे.

नाशिकच्या वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी उपाय सुचवले जाणार आहे. हवा प्रकल्पाची देखरेख, नेटवर्कचे ऑप्टिमायझेशन, सरकारी अधिकारी व माध्यमांची क्षमता वाढवणे, सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करणे आदी विविध उपाय योजनांच्या माध्यमातून प्रकल्पांवर काम केले जाईल. अखेरीस, या प्रकल्पात पायलट प्रकल्प विकसित केले जातील जे नाशिक शहरातील वास्तविक नियंत्रण रणनीतींच्या हवेच्या गुणवत्तेचे फायदे दर्शवू शकतील.

कोविडशी संबंधित लॉकडाऊनवरून असे दिसून आले आहे की, जर स्त्रोतांवर नियंत्रण ठेवले तर नाशिकसारख्या शहरात वायू प्रदूषण कमी होऊ शकते. तथापि, लॉकडाऊन ही त्यासाठी पर्याय होऊ शकत नाही. नाशिककरांच्या आर्थिक प्रगतीला बाधा न आणता प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा तंत्रज्ञानाचा वापर करून बचाव करता येणे शक्य आह,े अशी अनेक तंत्रज्ञान आहेत.जी आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रांमधील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपयोगात आणली जातात. यापैकी बर्‍याच यंत्राच्या माध्यमातून ठराविक कालावधीत हवा प्रदूषणावर मात करता येणे शक्य असून त्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपणास आर्थिक परतावा देखील मिळू शकणार आहे. त्यामुळे यादृष्टीने नियोजन करता येऊ शकते.

Related Stories

No stories found.