नाशिक मनपा स्थायीकडून २७५९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

२७ मे ला ऑनलाइन महासभेत मंजुरी मिळण्याची शक्यता
नाशिक मनपा स्थायीकडून २७५९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर
नाशिक मनपा

नाशिक | Nashik

करोना संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नात आधीच घट झाली असताना, २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता आयुक्तांनी सादर केलेल्या प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात स्थायी समितीने चारशे कोटींची वाढ सुचवित २७५९ कोटी रुपयांचे अंतिम अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले आहे.

महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी नगरसेवकांवर निधीची उधळण करतानाच, नाशकात पंचवटी, नवीन नाशिक व सातपूर भागात आणखी तीन विशेष कोविड रुग्णालये उभारण्यासाठीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. येत्या २७ मे रोजी होणाऱ्या ऑनलाइन महासभेत या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २३६१ कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी मार्च महिन्यात स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले होते.

करोना संकटामुळे विकासकामे अडचणीत आल्याने नागरिकांचा रोष पत्करलेल्या नगरसेवकांना विकासकामांसाठी प्रत्येकी ४० लाखांची भरीव तरतूद करताना, २०० कोटी रुपयांचे नवीन रस्ते, पूल व सांडवे बांधण्यासाठी २० कोटींची तरतूद आयुक्तांनी या अंदाजपत्रकात केली होती.

विशेष म्हणजे करोनामुळे महापालिकेच्या महसुलात घट झाली असली, तरी घरपट्टी, पाणीपट्टीसारख्या नागरिकांशी थेट संबध असलेल्या करांमध्ये कोणतीही वाढ न करण्याची दिलासादायक भूमिका आयुक्त जाधव यांनी घेतली होती.

नगररचना विभागाकडून युनिफाईड डीसीपीआरमुळे बांधकामाची जास्ती जास्त प्रकरणे येतील, हे गृहीत धरून साडेचारशे कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते. आयुक्तांचे हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सभापती गणेश गिते यांनी स्थायीची विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलवत या अंदाजपत्रकाला दुरुस्तीसह मंजुरी दिली होती.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी पाठविले जाते; मात्र मार्च महिन्यात करोनाची दुसरी लाट आल्यामुळे महासभेवर अंदाजपत्रक जाऊ शकले नाही. आता करोना उतरणीला लागल्याने स्थायी समितीने महासभेकडे अंदाजपत्रक मंजुरीची शिफारस केली आहे.

या अंदाजपत्रकात स्थायी समितीने विविध विकासकामांपोटी ४०० कोटी रुपयांची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रकाचा आकडा आता २७५९ कोटींवर पोहोचला आहे.

चौफेर विकासासाठी

नाशिक शहराचा चौफेर व समतोल विकास व्हावा, म्हणून निधीची तरतूद करण्यात आली आहे. सर्व प्रभागात विकास कामे व्हायला हवी. पंचवार्षिक कार्यकाळ संपत आला आहे. नाशिककरांवर कोणतीही नवीन करवाढ लादलेली नाही.

- गणेश गीते, सभापती, स्थायी समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com